चिखली शहरातील गजबजलेल्या बॉम्बे मार्केट परिसरात आज सकाळी भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली.
स्थानिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली
चिखली (Chikhli Fire) : चिखली शहरातील गजबजलेल्या बॉम्बे मार्केट परिसरात आज सकाळी भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. बॉन्द्रे पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या जहीर खान कुरेशी यांच्या भंगार दुकानाला अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आग इतकी भीषण होती की काही वेळातच दुकानातील मोठ्या प्रमाणातील भंगार साहित्य जळून खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पेट्रोल पंपाच्या अगदी शेजारीच आग लागल्यामुळे काही काळ मोठा अनर्थ घडण्याची भीती निर्माण झाली होती. आग वाढत असल्याचे पाहून परिसरातील नागरिक, व्यापारी आणि वाहनधारकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
स्थानिक नागरिक, व्यापारी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित विभागाकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे बॉम्बे मार्केट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.