Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

चिखली बाजार समिती सभापतीपदासाठी हालचालींना वेग; महाविकास आघाडीकडून संचालकांची मते जाणून घेण्यास सुरुवात

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.


चिखली बाजार समिती सभापतीपदासाठी हालचालींना वेग महाविकास आघाडीकडून संचालकांची मते जाणून घेण्यास सुरुवात

Chikhli APMC |

चिखली (Chikhli APMC) : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विद्यमान सभापती डॉ. संतोष वानखडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी १३ जून रोजी निवडणूक होणार असून, त्यापूर्वी महाविकास आघाडीकडून इच्छुकांची चाचपणी आणि संचालकांची मते जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

बाजार समितीवर सध्या महाविकास आघाडीची सत्ता असल्याने सभापतीपदाचा अंतिम उमेदवार ठरविताना आघाडीतील प्रमुख नेत्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे इच्छुकांकडून विविध स्तरांवर संपर्क, शिफारशी आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे. सभापतीपदासाठी आपणच सक्षम दावेदार असल्याचे पक्षश्रेष्ठींना पटवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते श्यामभाऊ उमाळकर यांनी नुकतीच चिखली येथे भेट देऊन बाजार समितीच्या संचालकांशी चर्चा केली. त्यांनी सर्व संचालकांची स्वतंत्रपणे मते जाणून घेतल्याची माहिती समोर येत आहे. सभापतीपदासाठी सर्वमान्य आणि सक्षम उमेदवार कोण ठरू शकतो, याबाबत संचालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्याचे समजते.

सभापतीपदासाठी सुरुवातीला कमलबाई विष्णू पाटील कुलसुंदर, समाधान सुपेकर, समाधान परिहार, पांडुरंग पाटील भुतेकर आणि रामभाऊ जाधव या नावांची चर्चा होती. मात्र, चर्चेतील पांडुरंग पाटील भुतेकर (ईसरूळ) आणि समाधान परिहार (अंचरवाडी) यांची गावे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात येत असल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीवर चिखली विधानसभा मतदारसंघाचा प्रभाव अधिक असल्याने महाविकास आघाडीचे प्रमुख नेते तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता कमलबाई कुलसुंदर, रामभाऊ जाधव आणि समाधान सुपेकर या तीन नावांमध्येच खरी रस्सीखेच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

प्राधिकृत अधिकारी राजेंद्र घोंगे यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १३ जून रोजी सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिवभोजगृहात विशेष सभा होणार आहे. नामनिर्देशन प्रक्रिया, छाननी, अर्ज माघारी आणि आवश्यक असल्यास मतदान घेऊन त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

एकूणच, सभापतीपदाच्या निवडणुकीमुळे चिखलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महाविकास आघाडीकडून कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होते आणि सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १३ जूनच्या निवडीकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: