Chikhali Monkey Attack: चिखली येथे वानराच्या धक्क्याने छतावरील महिला खाली कोसळली. गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचार बाळापूर व नांदेड येथे केला जात आहे.
आखाडा बाळापूर (Chikhali Monkey Attack) : कळमनुरी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात वानरांच्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. चिखली येथे छतावर गेलेल्या महिलेला वानराने अचानक धक्का दिल्याने ती खाली कोसळून गंभीर जखमी झाली. जखमी महिलेवर प्रथम बाळापूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे, अशी माहिती बाजार समिती संचालक अमोल चव्हाण व नागोराव चव्हाण यांनी दिली.
कळमनुरी तालुक्यातील शेतशिवारात आणि गावोगावी वानरांचा उपद्रव वाढला आहे. उन्हाळ्यामुळे शेतशिवारातील पाणीसाठे आटले असून खाण्यासाठी पिकेही शिल्लक नसल्याने वानरांच्या टोळ्या गावातील घरांच्या छतावर, पत्र्यावर धुमाकूळ घालत आहेत. उन्हाळ्यात छतावर वाळत घातलेल्या कुरडया, पापड, शेवया व इतर खाद्यपदार्थ खाणे, नासधूस करणे, तसेच अनेकदा घरातून भाकरी व इतर साहित्य उचलून नेण्याचे प्रकार घडत आहेत.
दरम्यान, मंगळवारी (Chikhali Monkey Attack) चिखली येथील नंदाबाई संतोष चव्हाण (वय 40) या छतावर गेल्या असता अचानक वानराने त्यांना धक्का दिला. त्यामुळे त्या छतावरून खाली कोसळून गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने बाळापूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. मार गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आल्याचे बाजार समिती संचालक अमोल चव्हाण यांनी सांगितले. यापूर्वीही आखाडा बाळापूर येथे क्लासला जाणाऱ्या एका लहान विद्यार्थ्याच्या हाताचा वानराने अचानक चावा घेऊन त्याला जखमी केले होते.