प्रशासनाला आंदोलनाचा इशारा; पाणीपुरवठा व कचरा व्यवस्थापनावर गंभीर आरोप
चिखली (Chikhali water scarcity) : चिखली शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा, वाढती पाणीटंचाई आणि ढासळलेल्या स्वच्छता व्यवस्थेविरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) नगरसेवकांनी नगर परिषद प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत निवेदन सादर केले. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विरोधी नगरसेवकांनी दिला आहे.
निवेदनात काँग्रेस व राष्ट्रवादी (अजितदादा गट) नगरसेवकांनी आरोप केला आहे की, शहरात सुरू असलेल्या नवीन (Chikhali water scarcity) पाणीपुरवठा योजनेचे काम संबंधित कंत्राटदाराकडून निष्काळजीपणे करण्यात येत आहे. त्यामुळे जुन्या पाईपलाईनद्वारे होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून काही भागात आठ दिवसांनी तर काही भागात तब्बल वीस दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच शहरातील कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडल्याचा आरोपही करण्यात आला. अनेक कचरा गाड्या नादुरुस्त असून सफाई कर्मचारी केवळ कागदोपत्री काम करत असल्याचे नगरसेवकांनी म्हटले आहे. अनेक गाड्यांवर सहाय्यक कर्मचारी नसल्याने नियमित कचरा संकलन होत नसल्याचा आरोप करण्यात आला. नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शहरातील मूलभूत प्रश्नांबाबत प्रशासन उदासीन असल्याचा आरोप करत तातडीने योग्य निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा नागरिकांसह आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही विरोधी नगरसेवकांनी दिला आहे.
या निवेदनावर प्राचार्य डॉ. निलेश गावंडे, डॉ. मो. इसरार, प्रा. मिनलताई गावंडे, उबेद अली खान, आनंद बोंद्रे, संध्या आनंद बोंद्रे, अमोल लहाने, गोकुळ शिंगणे, संतोष देशमुख, रत्नदीप यशवंत शिनगारे, गोपाल देव्हडे, प्रशांत भटकर, सुप्रिया प्रशांत भटकर, पी. एस. वायाळ, डॉ. प्रकाश शिंगणे, सीमा गोपाल देव्हडे, समीर जकाऊल्ला, स्वाती अमोल लहाने, सुनिता प्रकाश शिंगणे, शीतल संतोष देशमुख, मोहम्मद आसिफ आदी नगरसेवकांच्या सह्या आहेत.
दरम्यान, प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांनी नगर परिषद प्रशासनावर टीका करत गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित प्रश्न सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप केला. “चिखलीकरांच्या कराचा पैसा विधायक कामांसाठी खर्च झाला पाहिजे. आम्ही जनतेच्या समस्यांसाठी सातत्याने लढत राहू,” असे त्यांनी सांगितले.