Chikhli Bus Station: चिखली आगारात बसस्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी २०० मीटर ''नो पार्किंग'' झोनच्या अंमलबजावणीसंदर्भात टॅक्सी संघटनेचे प्रतिनिधी व एसटी महामंडळ
चिखली (Chikhli Bus Station) : चिखली आगारात बसस्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी २०० मीटर 'नो पार्किंग' झोनच्या अंमलबजावणीसंदर्भात टॅक्सी संघटनेचे प्रतिनिधी व एसटी महामंडळ समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस एसटी महामंडळाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी कांडेलकर, चिखली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण मोरे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सपकाळ, चिखली आगार व्यवस्थापक जोगदंडे, स्थानक प्रमुख नागरे तसेच टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी सुरक्षा व दक्षता अधिकारी कांडेलकर यांनी बसस्थानक परिसरातील २०० मीटर 'नो पार्किंग' (Chikhli Bus Station) नियमाची माहिती देत, या नियमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. सुरुवातीला जनजागृती करून टॅक्सी चालकांचे सहकार्य घेतले जाईल. नियमांचे पालन केल्यास कोणावरही कारवाई केली जाणार नाही, मात्र बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात वाहने उभी न करता एसटी महामंडळाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सपकाळ यांनी बसस्थानक परिसरात टॅक्सी उभ्या करून प्रवासी चढ-उतार केल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून, त्यामुळे अपघाताच्या घटनाही घडल्याचे सांगितले. सुरक्षित वाहतुकीसाठी सर्वांनी नियमांचे पालन करून २०० मीटर परिसरात वाहने उभी न करण्याचे आवाहन त्यांनी केले. आगार व्यवस्थापक जोगदंडे यांनी टॅक्सी चालक व संघटनांच्या प्रतिनिधींना एसटी महामंडळाच्या कामकाजात सहकार्य करण्याचे आवाहन केले. बसस्थानक परिसरातील २०० मीटर हद्दीबाहेर वाहने उभी करून वाहतूक व्यवस्थेला हातभार लावावा, असे त्यांनी सांगितले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून पोलिस उपनिरीक्षक प्रवीण मोरे यांनी सर्व टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. वाहतूक शिस्त राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठकीत टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींनीही प्रशासनाशी समन्वय ठेवून वाहतूक नियमांचे पालन करण्याची भूमिका व्यक्त केली. बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.