India Emergency: देशाच्या लोकशाही इतिहासातील २५ जून १९७५ हा दिवस काळ्या अक्षरांनी लिहिला गेला आहे. आणीबाणीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य आणि नागरिकांचे मूलभूत हक्क..
चिखली (India Emergency) : देशाच्या लोकशाही इतिहासातील २५ जून १९७५ हा दिवस काळ्या अक्षरांनी लिहिला गेला आहे. आणीबाणीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य आणि नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेण्यात आले. हजारो लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना विनाकारण तुरुंगात डांबण्यात आले. मात्र या दडपशाहीविरुद्ध अनेक देशभक्तांनी धैर्याने लढा देत लोकशाहीचे संरक्षण केले. हा संघर्ष आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी केले.
आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त (India Emergency) "आणीबाणीतील संघर्षगाथा – मिसाबंदी व जनसंघ स्वयंसेवकांचे आत्मकथन" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली नगरपालिकेत करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष पंडितराव देशमुख प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमात आणीबाणीच्या काळातील संघर्षाचे जिवंत साक्षीदार तथा मिसाबंदी राजाभाऊ खरात यांचा ज्येष्ठ भाजप नेते अंकुशराव पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. लोकशाही रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मिसाबंदींच्या त्यागाचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांना मानवंदना अर्पण केली.
यावेळी राजाभाऊ खरात यांनी आणीबाणीच्या काळातील संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत त्या काळातील अनुभव उपस्थितांसमोर मांडले. लोकशाहीचे महत्त्व, संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास रामदासभाऊ देव्हडे, सुहासभाऊ शेटे, शहराध्यक्ष सागर पुरोहित, रफिक सेठ, सुरेंद्रसिंह ठाकूर, बाळू जाधव, सुधीरभाऊ तांबट, युवराज भुसारी, सिद्धेश्वर ठेंग, श्याम वाकतकर, नरेंद्र मोरवाल, निलय गोंधने, नज्जू साहेब यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.