Chikhli Nagar Parishad: चिखली नगर परिषदने 'विना वाहन' (No Vehicle Day) मोहिमेला सुरू केले आहे, ज्या तहत शहरातील नागरिकांना इंधन बचत करण्यासाठी
लोकप्रतिनिधींचे पायदळ भ्रमण; नागरिकांना ‘नो व्हेईकल डे’चे आवाहन
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली (Chikhli Nagar Parishad) : जागतिक स्तरावर सातत्याने घटणारे इंधनाचे साठे, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आणि पर्यावरण संरक्षणाची गरज लक्षात घेऊन चिखली नगर परिषदेने इंधन बचतीसाठी अभिनव पुढाकार घेत ‘विना वाहन’ मोहिमेला सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत आज नगर परिषदेचे माननीय अध्यक्ष पंडितराव देशमुख, उपाध्यक्ष, सभापती तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका यांनी शहरात पायदळ भ्रमण करून नागरिकांशी थेट संवाद साधत इंधन बचतीचा संदेश दिला.
या वेळी नगर परिषदेच्या (Chikhli Nagar Parishad) सर्व लोकप्रतिनिधींनी स्वतः दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचा वापर टाळून शहरात पायी फिरत एक आदर्श निर्माण केला. नागरिकांनी आठवड्यातून किंवा महिन्यातून किमान एक दिवस ‘विना वाहन’ (No Vehicle Day) पाळून आपले दैनंदिन कामकाज करावे, असे आवाहन करण्यात आले. या मोहिमेमुळे इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होण्यास मदत होणार असून, वायू प्रदूषणात घट होऊन पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार आहे. तसेच वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांच्या आरोग्यासाठीही हा उपक्रम फायदेशीर ठरणार असल्याचे नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, या (Chikhli Nagar Parishad) मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषदेच्या मा. मुख्याधिकाऱ्यांनी विशेष कार्यालयीन आदेश जारी केले आहेत. त्यानुसार नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनीही मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून कार्यालयात येताना तसेच दैनंदिन कामकाजादरम्यान वाहनांचा वापर टाळावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले की, “इंधन बचत ही केवळ पैशांची बचत नसून देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यावरणाला बळकट करणारे महत्त्वाचे पाऊल आहे. चिखलीकरांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी होऊन चिखली शहर पर्यावरणपूरक बनवण्यासाठी सहकार्य करावे.” चिखली नगर परिषदेच्या या अभिनव आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, नागरिकांकडूनही ‘विना वाहन’ मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे.