भारतीय जनता पक्षाने आपली 'चाणक्यनीती' वापरत जिल्हा परिषदेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून, अविनाश गलांडे यांची अध्यक्षपदी, तर जितेंद्र जैस्वाल यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
अविनाश गलांडे अध्यक्ष, तर जितेंद्र जैस्वाल उपाध्यक्षपदी बिनविरोध
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad) : मागील अनेक दिवसांपासून राज्याचे लक्ष लागून असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीचा थरार अखेर संपला आहे. भारतीय जनता पक्षाने आपली 'चाणक्यनीती' वापरत जिल्हा परिषदेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून, अविनाश गलांडे यांची अध्यक्षपदी, तर जितेंद्र जैस्वाल यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
मात्र, या निवडीने महायुतीमधील 'ऑल इज नॉट वेल' असल्याचे दिसत असून, दोन्ही शिवसेनेने या मतदानावर टाकलेला बहिष्कार जिल्ह्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फोडणारा ठरला आहे.
निवडणुकीच्या आदल्या रात्रीपर्यंत सत्तेचे पारडे नेमके कोणाकडे झुकेल, याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात होती. भाजपकडे स्वतःचे २३ सदस्य होते, परंतु बहुमतासाठी ३२ आवश्यक असलेल्या आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी मध्यरात्रीपासूनच सूत्रे हलवली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या सदस्यांना आपल्या गोटात खेचण्यात भाजपला यश आले. काँग्रेसचा एक सदस्य आधीच भाजपच्या संपर्कात होता. दुसरीकडे, शिंदे सेनेचे काही स्थानिक नेते 'उबाठा' गटाला सोबत घेऊन भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा 'डाव' आखत असल्याची चर्चा होती, मात्र ऐनवेळी संख्याबळ जुळत नसल्याचे पाहून दोन्ही शिवसेनेने सभागृहात न येता बहिष्काराचे हत्यार उपसले.
घराणेशाहीचा हट्ट?
जिल्हा परिषदेच्या (Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad) या रणधुमाळीत 'घराणेशाही'चा मुद्दा सर्वाधिक गाजला. युतीच्या प्राथमिक चर्चेत '५०-५०' चा फॉर्म्युला ठरला होता, ज्यानुसार पहिले अडीच वर्षे भाजपचा अध्यक्ष होणार होता. मात्र, शिवसेनेच्या (शिंदे गट) काही बड्या नेत्यांना आपल्याच घरातील व्यक्तीला किंवा जवळच्या नातेवाईकाला या खुर्चीवर बसवायचे होते. याच हट्टापायी युतीमध्ये मिठाचा खहा पहला आणि संवाद थांबला. परिणामी, भाजपने स्वतंत्रपणे फिल्डिंग लावून आपले वर्चस्व सिद्ध केले.