Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मुंबई

Chembur Tree Collapse

शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; महापालिकेवर सुधीर मुनगंटीवार यांचा संताप

मुंबईतील चेंबूर परिसरात ३० जून दुपारी सुमारे तीनच्या सुमारास घडलेल्या भीषण दुर्घटनेत शाळेच्या बसवर पिंपळाचे मोठे झाड कोसळल्याने ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.


शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू महापालिकेवर सुधीर मुनगंटीवार यांचा संताप

Chembur Tree Collapse |

झाड हटविण्याबाबत आधीच निवेदन दिल्याचा दावा

मुंबई (Chembur Tree Collapse) : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील चेंबूर परिसरात मंगळवारी (३० जून) दुपारी सुमारे तीनच्या सुमारास घडलेल्या भीषण दुर्घटनेत शाळेच्या बसवर पिंपळाचे मोठे झाड कोसळल्याने ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर झेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून महापालिकेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ही दुर्घटना चेंबूरमधील रोड क्रमांक ११ येथे घडली. अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण १२ विद्यार्थी प्रवास करत होते. झाड अचानक बसवर कोसळताच विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बसमधील वाहक आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत बसच्या काचा फोडून तसेच दरवाजे उघडून सर्व १२ विद्यार्थ्यांना बाहेर काढले.

या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या विहान श्रीवास्तव (वय ११) याला इतर जखमी विद्यार्थ्यांसह झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी ४.२३ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उर्वरित चार विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, ही बस टिळकनगर येथील युनिव्हर्सल शाळेची असल्याचे समोर आले आहे. झाड कोसळल्यामुळे बसचा वरचा भाग मोठ्या प्रमाणात चेपला गेला. घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य हाती घेतले.

या दुर्घटनेनंतर भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेवर जोरदार टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित झाड धोकादायक असल्याची माहिती नागरिकांनी यापूर्वीच निवेदनाद्वारे महापालिकेला दिली होती. तरीही झाड हटविण्याची कारवाई करण्यात आली नाही.

यावेळी त्यांनी महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत, "लोखंडाला गंज लागू शकतो; पण लोकांच्या निवेदनालाही गंज चढतो का? शेतकरी पावसाळ्यात काम करतो, मग महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना काम करायला काय अडचण आहे?" असा सवाल केला.

तसेच, "जनतेच्या करातून पगार घेणारे अधिकारी आणि कर्मचारी काम का करत नाहीत? नागरिकांनी झाड काढण्याबाबत निवेदन दिल्यानंतरही कारवाई झाली नाही. निवेदन वाचूनही काम होत नसेल तर त्यांच्या बुद्धीलाच गंज चढला आहे का?" असा संतप्त सवालही त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

उल्लेखनीय म्हणजे, गेल्याच महिन्यात मुंबईतील खार परिसरात झाड कोसळून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत चेंबूरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेमुळे धोकादायक झाडांच्या व्यवस्थापनाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Related to this topic: