Water Supply Department: कळमनुरी नगर परिषदेने पाणीपुरवठा विभागातील निष्काळजी करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. नागरिकांच्या तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आली.
नगराध्यक्ष व नगरसेवक बैठकीनंतर ही कारवाई
कळमनुरी (Water Supply Department) : शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर २२ एप्रिल रोजी झालेल्या नगर परिषद सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस सुधारणा न झाल्याचे दिसून आल्याने अखेर प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील अनियमितता, दैनंदिन कामकाजातील दिरंगाई, टाळाटाळ आणि निष्काळजीपणामुळे सभासदांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. ठरलेल्या दिवशी पाणी न सोडणे, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे, मोबाईल बंद ठेवणे तसेच गैरजबाबदार वर्तन यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती.
या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी रविराज दरक यांनी २४ एप्रिल रोजी लिपिक एस. टी काळे, शिपाई निळकंठ मस्के तसेच वालमेन बाळू खंदारे, जब्बार शेख या चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) अधिनियम १९८१ नुसार ही कारवाई करण्यात आली असून निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय नगरपरिषद कळमनुरी येथे निश्चित करण्यात आले आहे. तसेच या काळात संबंधित कर्मचाऱ्यांना कोणताही खाजगी किंवा इतर व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, २४ एप्रिल रोजी नगराध्यक्ष व नगरसेवकांची पाणीपुरवठ्या बाबत बैठकही पार पडली या बैठकीत नगराध्यक्षा आश्लेषा वैभव चौधरी,राष्ट्रवादी गट नेता तथा नगर सेवक अय्युब पठान,नगर सेवक खाजा बागबान,बबलु पत्की,शिव सेना गट नेता तथा नगर सेवक रवी शिंदे,नगर सेविका अर्चना खर्जुले,नगर सेविका फहीमुन्निसा बेगम अब्दुल्ला पठान,नगर सेवक जि. एस बेले,नगर सेवक प्रकाश घुसे,कैलास पारवे, शैलेश उबाळे तसेच या बैठीकित मुख्य अधिकारी रवि राज दरक,नगर अभियंता निकेत यरमाळ, अमोल मोरे,मनोज नखवाल सहीत ईतर नगर सेवक उपस्थित होते सद्या कळमनुरी शहराला इसापुर धरणातून पाणीपुरवठा होत असून सध्या धरणात सुमारे ६२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. उन्हाळ्यासाठी पुरेसा साठा आरक्षित असतानाही कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शहराला अनियमित (Water Supply Department) पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत होता.
कारवाईनंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार का?
नगरपालिका मुख्याधिकारी पाणीपुरवठा (Water Supply Department) वर सक्त कारवाई करून चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले तसेच पाणीपुरवठा करण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. हे कारवाई नंतर शहराच्या पाणीपुरवठा सुरळीत होणार का असा प्रश्न नागरिकाकडून व्यक्त होत आहे.