Breaking News
  • मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
  • पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट, नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!
  • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड
  • नंदुरबारमध्ये 93 लाखांचा 186 किलो गांजा जप्त
  • OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत
  • माकडांमुळे शाळा बंद, विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून पळाले

होम > आपले शहर > पुणे

Chakan MIDC

चाकण MIDC वरून रोहित पवारांचा उदय सामंतांवर निशाणा; ‘एवढे दिवस काय गोट्या खेळत होतात का?’

चाकण एमआयडीसीतील प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.


चाकण midc वरून रोहित पवारांचा उदय सामंतांवर निशाणा ‘एवढे दिवस काय गोट्या खेळत होतात का’

उद्योगमंत्र्यांनी केवळ आश्वासने न देता कामांची आकडेवारी दाखवावी; चाकणमधील 30 टक्के वाढीच्या दाव्यावर रोहित पवारांचे ‘ओपन चॅलेंज’

चाकण एमआयडीसीतील प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चाकण एमआयडीसीमध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न होत असल्याच्या उदय सामंत यांच्या वक्तव्याला उत्तर देताना रोहित पवार यांनी उद्योगमंत्र्यांच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

रोहित पवार म्हणाले की, उदय सामंत हे राजकीय घडामोडींमध्ये अधिक व्यस्त असतात. मात्र, चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि नागरिकांसाठी त्यांनी नेमकं काय केलं, हे त्यांनी सांगावं. चाकण एमआयडीसीतील अडचणींबाबत उद्योजकांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये पोहोचले. आम्ही याआधीच तिथे जाऊन प्रश्न मांडले होते, असा दावा करत रोहित पवार यांनी सामंतांवर निशाणा साधला.

उद्योजकांनी समस्या मांडल्यानंतरच उद्योगमंत्र्यांची चाकण भेट झाली, मग इतके दिवस ते काय करत होते, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांची कामे 10 महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आता या आश्वासनांची प्रत्यक्षात किती अंमलबजावणी होते, याकडे आम्ही लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करून देऊन कर्मचाऱ्यांसाठी घरकुल उभारण्याचा उपाय सुचवण्यात आल्यावरही रोहित पवार यांनी टीका केली. केवळ मोघम स्वरूपाची वक्तव्ये आणि आश्वासने देण्याऐवजी उद्योगमंत्र्यांनी नेमकी कोणती कामे करणार आहेत, हे स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

रोहित पवार यांनी चाकण एमआयडीसीमधील वाढीच्या आकडेवारीवरूनही उदय सामंतांना आव्हान दिले. चाकणमध्ये 30 टक्के वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा आकडेवारीच्या आधारे सिद्ध करून दाखवावा, असे रोहित पवार म्हणाले.

उदय सामंत चाकणमध्ये येणार असल्याने रस्त्यांवर डांबर टाकून ते तात्पुरते व्यवस्थित करण्यात आले, असा आरोपही रोहित पवार यांनी केला. रविवारी झालेल्या बैठकीत केवळ चर्चा आणि आश्वासनांचा पाऊस झाला असून, प्रत्यक्षात पुढे काय काम केले जाते, हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

उदय सामंत हे गेल्या पाच वर्षांपासून राज्याचे उद्योगमंत्री आहेत. त्यामुळे व्यावसायिक, उद्योजक आणि चाकण एमआयडीसीतील नागरिकांसाठी त्यांनी आतापर्यंत काय केले, याचा तपशील त्यांनी द्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

Related to this topic: