बाणेर येथील फॉर्च्युन हाऊस इमारतीतील चितळे बंधू आणि काका हलवाई यांच्या आउटलेटमध्ये झालेल्या दुकानफोडीप्रकरणी बनर पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.
पुणे (Burglary Investigation) : बाणेर येथील फॉर्च्युन हाऊस इमारतीतील चितळे बंधू आणि काका हलवाई यांच्या आउटलेटमध्ये झालेल्या दुकानफोडीप्रकरणी बनर पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी पुणे शहरातील विविध भागांतील तब्बल २२५ हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शिवम दत्ता अवचार (वय १९, रा. कामठे कॉलनी, अभिनव कॉलेजजवळ, नर्हे) आणि करण शिवाजी जमादार (वय १९, रा. परमोल कॅफेजवळ, सिंहगड कॉलेज परिसर, वडगाव) अशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास आरोपींनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच सुमारे ६६ हजार रुपयांची रोकड त्यांनी चोरून नेल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर बनर पोलिसांच्या तपास पथकाने सखोल तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेत शिवाजीनगर, घोरपडी, हडपसर, रामटेकडी, आळंदी, नर्हे आणि आंबेगाव परिसरातील २२५ हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच ते वारंवार राहण्याची ठिकाणे बदलत असल्याने त्यांचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन दुचाकी, एक आयफोन, घरफोडीसाठी वापरले जाणारे हत्यार, १२ हजार रुपयांची रोकड आणि सोन्याची मोहोर जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश रायकर करीत आहेत.
ही कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला आणि सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल दाबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक विजय खिल्लारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश रायकर तसेच पोलिस कर्मचारी गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसान शिंगे, निकाळजे, अतुल इंगळे, प्रदीप खरात, शरद राऊत, गजानन अवतीरक, स्वप्नील मराठे, गणेश भोईणे आणि समीर पवार यांचा समावेश होता.