Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

बुलढाणा गोवर्धन गझल

गजलगुंजन: बुलढाण्यातील गोवर्धन गझलांनी गुंजला!!

Buldhana Govardhan Ghazal: गजलगुंजन: बुलढाणा अर्बनचा गोवर्धन हॉल या कार्यक्रमाच्या माध्यमातून गझलांनी अक्षरश: गुंजला, महाराष्ट्रात गाजलेल्या प्रख्यात गझलकार गुंजन पाटील यांच्या विविध गझलांनी रसिकांची


गजलगुंजन बुलढाण्यातील गोवर्धन गझलांनी गुंजला

Buldhana Govardhan Ghazal |

 

माझं मीपण मला बोचतं, मी कधीच सांगितलं नाही...माझा झरा माझा पाऊस, मी कधीच मागितला नाही!

राजेंद्र काळे
बुलढाणा (Buldhana Govardhan Ghazal) :

माझी दुनिया, माझं घर..
मी काय शोधायचे?
कट्ट्यावरती हुल्लड घालता,
मुलं रोज बघायचे!
मुजोर वारा कधी उरी,
झिम्मा घालत दाटायचा..
रोम-रोम तुटताना,
सूर्य कवटाळू वाटायचा!
कधी वाटे बंध तोडून,
मोकळे होऊन जरा जगू..
बाईपण जरा राहू दे,
बाबा होऊन का बघू?
बाईचं जीवन अवघड असतं,
इतकंच आईने सांगितलं..
ऐकून मीही आई झाले,
कधीच काही नाही मागितलं!
माझं मीपण मला बोचतं,
मी कधीच सांगितलं नाही..
माझा झरा माझा पाऊस,
मी कधीच मागितला नाही!

गजलगुंजन: बुलढाणा अर्बनचा गोवर्धन हॉल या (Buldhana Govardhan Ghazal) कार्यक्रमाच्या माध्यमातून गझलांनी अक्षरश: गुंजला, महाराष्ट्रात गाजलेल्या प्रख्यात गझलकार गुंजन पाटील यांच्या विविध गझलांनी रसिकांची वाहवा मिळवली. त्यांच्यासोबत
समजू नको ढगा हे साधेसुधे बियाणे,
मी पेरले पिलांच्या चोचीमधील दाणे..
उघडा पडेल सारा संसार हा अशाने,
मिटणार प्रश्न नाही गळफास घेतल्याने!
अशा गझलांनी मराठी गझलेचा प्रांत गाजवणारा आबेद शेख तर वैद्यकीय सर्जन असूनही गझलेतील सर्जनशीलता
आदमी देखकर बोलना चाहीए,
बात को हर घडी तोलना चाहिए!’
अशा विविध उर्दू गझलांच्या माध्यमातून तोलणारे डॉ.गणेश गायकवाड व या कार्यक्रमाची धुरा
एक घमघमता लिफाफा धाडला आहे,
मी तुला पत्रात चाफा धाडला आहे..
आज केवळ एक उचकी धाडली नाही,
आठवांचा पूर्ण चाफा धाडला आहे!
अशा गझलांच्या माध्यमातून सुत्रसंचालक म्हणून सांभाळणारे गोपाल मापारी.. हे त्यांच्या सोबतीला होते !

बुलढाण्यातील मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटी, एक्स कारगिल सर्विसमन कार्पोरेशन, रविकिरण छायाचित्रण या सहयोगी संस्थांच्या वतीने गझल गुंजन या अनोख्या गझल कविता व गप्पांच्या कार्यक्रमाचे आयोजन गोवर्धन सभागृहात शनिवार २० जून रोजी करण्यात आले होते.

प्रेमासाठी वेडी डोक्यात खूळ आहे,
बहिणाबाईचे गाव, मीराचे हे कुळ आहे..
तुझ्याविना कशी आहे, आजून काय सांगू?
कृष्णाविना उदास, जसे गोकुळ आहे!
अशा भावनिक गजलांसह
सारेच म्हणतात- मन काही मानत नाही,
की कुणी मनासारखं वागत नाही..
मनाने फार गुंता केला माणसांचा, 
पण याचा शोध काही लागत नाही !


अशी बहिणाबाई यांच्या "मन वढाय वढाय" या साच्यातील कविता "ही तळमळ ही जळजळ कुणाच्या आठवणींची मळमळ नकोच होती" असा अंतर्मनातला भाव नमूद करताना 
"मन नावाचा अवयव असता तर सर्जरी करून घेतली असती.." असं म्हणणं गुंजन पाटलांच्या माध्यमातून सांगून जातो.

अशा विविध (Buldhana Govardhan Ghazal) गझलांच्या माध्यमातून गुंजन पाटील गझल रसिकांच्या काळजाचा ठाव घेत असतांना

सवय तुझी जडली, त्याचं काय करू?
मी स्वतःला नडली, त्याचं काय करू?
हसून थट्टा केली किती प्रेमकथांची,
माझी खोड मोडली, त्याचं काय करू?
झुळूक वार्‍याची येता मला तू भासतो,
या श्वासाची गती वाढते, त्याचं काय करू?
कधीच घेतले नाही तुझे नाव मी ओठी..
डोळे ऐकत नाही माझं, त्याचं काय करू? आवर घालते किती, का बाजींदा होते..
मनाने लाज सोडली, त्याचं काय करू?

असा लडीवाळ सवालही गझलेतून विचारत होत्या.

वाचले ना, चाळले त्यांनी मला,
बघ, कसे चुरगाळले त्यांनी मला..
मी स्वतःला दगड केले शेवटी,
मग कुठे ओवाळले त्यांनी मला?
उद्देश पावलांचा, जाणे पुढेच जाणे..
हे ध्येय काय आहे? थांबायाचे बहाणे!
अशा विविध गझलांसह
पाठीत वार माझ्या, हज्जार खंजीराचे.. ठोठावतो तरी मी उपकार खंजिराचे !
ओठात एक असते, पोटात एक असते
..
सारेच लोकनेते अवतार खंजिराचे!!
अशा गझलांनी आबेद शेख यांनी त्यांची छाप या मैफीलीवर सोडत असताना
यारहो क्षमा करत चला,
माणसे जमा करत चला !
हा माणुसकीचा संदेश देऊन जातो.

खाली जळते सरपण ठेवा,
वर देहाचा रांजण ठेवा..
नंतर ठेवा शव सरणावर,
आधी माझे मीपण ठेवा!
साधू नाही नेता मेला, 
तेराव्याला भाषण ठेवा!!
यासह 
चालण्याचा वसा सांगतो,
मी नव्हे तो ससा सांगतो..
या जिवाने जळावे किती, 
राख हो कोळसा सांगतो..
पाहुनी फक्त डोळ्यात मी, 
माणसांच्या नसा सांगतो..
माणसाने असावे कसे,
ऐक जा आरसा सांगतो..
दूर आम्ही कसे जाहलो, 
या जवळ या बसा सांगतो..

अशा गोपाल मापारी यांच्या गझलाही मधून-मधून दाद मिळवत होत्या.

पाहुण्यांच्या डॉ.वैशाली  निकम, डॉ.श्रेया जतकर, श्रृती तायडे आणि क्षितिज निकम यांनी  अनोख्या पद्धतीने परिचय करून दिला. सूत्रसंचालन रविकिरण टाकळकर यांनी तर आभार प्रदर्शन कर्नल सुहास जतकर यांनी केले, या कार्यक्रमासाठी बुलढाणा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.गजेंद्र निकम, पियुष टाकळकर, अभिषेक जतकर  यांनी कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला होता.