संघटन सृजन अभियानांतर्गत पक्षश्रेष्ठींकडून घोषणा; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
चिखली/ बुलढाणा (Buldhana Congress Committee) : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानांतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या पाहणी व कार्यकर्त्यांशी चर्चेनंतर बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रकाश रामभाऊ अवचार (पाटील) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या नियुक्तीस मान्यता दिली असून बुधवारी रात्री अधिकृत घोषणा करण्यात आली.
जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील रहिवासी असलेले प्रकाश पाटील avchar हे जिल्ह्यातील अभ्यासू, संयमी व तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाळ जपणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. अखिल भारतीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार मुकुल वासनिक तसेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे.
माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून काम केले होते. (Buldhana Congress Committee) संघटन सृजन अभियानादरम्यान त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून घाटाखालील भागाला जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
प्रकाश पाटील अवचार यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच विविध सहकारी संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून काम केले आहे. ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण, शेतकरी हितासाठी घेतलेली भूमिका, संघटन बांधणीतील कौशल्य आणि पक्षाप्रती निष्ठा यामुळे त्यांनी जिल्ह्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल, संघटन अधिक बळकट होईल आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्ष नव्या ताकदीने मैदानात उतरेल, असा विश्वास काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, मावळते जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या कार्याचाही कार्यकर्त्यांकडून गौरव करण्यात आला. गेल्या दहा वर्षांत त्यांनी जिल्हा काँग्रेस संघटना तळागाळापर्यंत पोहोचवून युवा व निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली. संघर्षाच्या काळात पक्षाशी निष्ठा राखत संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
प्रकाश पाटील अवचार यांचा परिचय:
प्रकाश रामभाऊ अवचार (पाटील) यांचा जन्म १ जानेवारी १९६५ रोजी पिंपळगाव काळे, ता. जळगाव जामोद येथे झाला. शिक्षण बी.ए. झाले असून व्यवसाय शेती आहे. त्यांनी युवक काँग्रेस अध्यक्ष, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषद अध्यक्ष अशी विविध पदे भूषविली आहेत. सध्या ते बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ग्रामीण नेतृत्व, शेतकरी प्रश्नांवरील अभ्यासू भूमिका आणि संघटन कौशल्य ही त्यांची विशेष ओळख मानली जाते.