Buddhist-Matanga Samaj: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नावरून समाजात निर्माण करण्यात येत असलेल्या वादामागे बौद्ध आणि मातंग या दोन समाजांना एकमेकांविरोधात उभे करण्याचे षड्यंत्र
उपवर्गीकरणानंतर पात्र उमेदवार न मिळाल्यास मातंग समाजाच्या रिक्त जागा खुल्या वर्गाकडे जाण्याचा इशारा
भारतीय बौद्ध महासभेची ३९७ वी बुद्ध वंदना प्रबुद्ध नगर येथे उत्साहात
अमरावती (Buddhist-Matanga Samaj) : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नावरून समाजात निर्माण करण्यात येत असलेल्या वादामागे बौद्ध आणि मातंग या दोन समाजांना एकमेकांविरोधात उभे करण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा सचिव नयन मोंढे यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जणू एकमेकांचे विरोधक होते, असे धादांत खोटे चित्र जाणीवपूर्वक उभे करून बहुजन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय बौद्ध महासभा, शाखा बडनेरा-अमरावतीच्या वतीने प्रबुद्ध नगर, वडाळी येथील विश्वशांती बुद्ध विहारात आयोजित करण्यात आलेली रविवार ची ३९७ वी बुद्ध वंदना उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि धम्ममय वातावरणात रविवार(ता.2) रोजी पार पडली. या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश बोरकर आणि जिल्हा सचिव नयन मोंढे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वर्षावासानिमित्त आयोजित विशेष प्रवचन मालिकेत समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक तथा नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष मदन खंडारे यांनी धम्म प्रवचनातून भगवान गौतम बुद्धांच्या कर्मसिद्धांताचे महत्त्व विशद केले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे (Buddhist-Matanga Samaj) बडनेरा शहराध्यक्ष के. डी. सांबारे, समता सैनिक दलाचे सुरेश दहाटे, जिल्हा संघटक आर. के. भटकर आणि जिल्हा महिला कोषाध्यक्ष मालती मेश्राम धम्मपीठावर विराजमान होते. मार्गदर्शन करताना नयन मोंढे म्हणाले की, अनुसूचित जातींमध्ये संघर्ष निर्माण करून 59 जातीतील समाजाची एकजूट कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व वंचित, शोषित आणि उपेक्षित समाजांना न्याय, समता आणि बंधुतेच्या सूत्रात बांधण्याचे कार्य केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्यातून श्रमिक, दलित आणि वंचित जनतेच्या वेदनांना वाचा फोडली. त्यामुळे या दोन महान व्यक्तिमत्त्वांमध्ये विरोध असल्याचे दाखविणे हा इतिहासाचा विपर्यास असून बहुजन समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर समाजांनी भावनिक प्रचाराला बळी न पडता त्याचे सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय परिणाम समजून घेणे आवश्यक असल्याचे मोंढे यांनी सांगितले. सध्या एकत्रित आरक्षण व्यवस्थेमुळे अनुसूचित जातींमधील ५९ जातींच्या पात्र उमेदवारांना परस्पर स्पर्धेची संधी उपलब्ध आहे. गुणवत्तेच्या आणि पात्रतेच्या आधारे विविध समाजांतील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. मात्र उपवर्गीकरणामुळे स्वतंत्र कोट्याची रचना झाल्यास संबंधित उपवर्गात पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास त्या जागांच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
मातंग समाजाच्या (Buddhist-Matanga Samaj) स्वतंत्र आरक्षित जागांसाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या रिक्त जागा खुल्या वर्गाकडे जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे उपवर्गीकरणाच्या प्रश्नाकडे केवळ एका समाजाच्या हिताचा विषय म्हणून न पाहता, सर्व अनुसूचित जातींच्या दीर्घकालीन सामाजिक, शैक्षणिक आणि रोजगारविषयक हिताच्या दृष्टीने विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थितांनी बुद्ध वंदना, त्रिशरण, पंचशील आणि धम्मविचारांच्या माध्यमातून सामाजिक समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला. विश्वशांती बुद्ध विहार परिसरात धम्ममय वातावरण निर्माण झाले होते. उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यालयीन सचिव राहुल शेंडे, किशोर खोब्रागडे, व्ही. एस. मेश्राम, अशोक धनगर, यशवंत बादसे, साहेबराव मोहोळ, मुकुंद मेश्राम, के. डी. सांबारे, अशोक बनसोडे, अशोक तायडे, अजयकुमार ढोके, अरुण शेंडे, पंजाब गेडाम, ललिता वाघपांजर, इंद्रकला धांडे, संध्या भगत, छाया तायडे, सुवासिनी धाकडे, उषा वानखडे, राजकन्या इंगळे, ललिता धनधर, अर्जुन वाकपांजर, राज तायडे, बाबुराव धाकडे, प्रशांत तायडे, प्रदीप बादसे, रंजना भालेकर, आर. आर. राऊत, माया बोरकर, सुरेश दहाटे यांच्यासह प्रबुद्ध नगर परिसरातील बौद्ध उपासक-उपासिकांनी परिश्रम घेतले.