शहरातील सावनेर-नागपूर बायपास रोडलगत असलेल्या देशमुख ले-आऊट, वॉर्ड क्र. १० मधील नाल्यावरील पुलाची अवस्था सध्या अत्यंत चिंताजनक झाली आहे.
कळमेश्वर, वॉर्ड क्र. १० मधील नाल्यावरील पुलाची अवस्था दयनीय, अपघातांचा धोका वाढला
कळमेश्वर (Bridge Safety Issue) : शहरातील सावनेर-नागपूर बायपास रोडलगत असलेल्या देशमुख ले-आऊट, वॉर्ड क्र. १० मधील नाल्यावरील पुलाची अवस्था सध्या अत्यंत चिंताजनक झाली आहे. हा अरुंद आणि वळणावरील पूल सध्या मृत्यूचा सापळा बनला असून, प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता आधी पुलाची दुरुस्ती करावी, अशी आक्रमक भूमिका संतप्त नागरिकांनी घेतली आहे.
या पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढली आहेत, ज्यामुळे वळणावर समोरून येणारे वाहन चालकांना वेळेवर दिसत नाही. पुलावरील रस्ता अनेक ठिकाणी उखडला असून संरक्षक लोखंडी रेलिंगही पूर्णपणे जीर्ण झाली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी दिशादर्शक फलक आणि पुरेशा प्रकाशाअभावी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून अपघाताचा धोका अनेक पटींनी वाढला आहे. केवळ वाहतूकच नव्हे, तर सार्वजनिक सुरक्षिततेचे इतर प्रश्नही येथे गंभीर आहेत. पुलाच्या अगदी शेजारी असलेला वीजवितरण बॉक्स उघडा आणि गंजलेल्या अवस्थेत आहे, जो नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो. हा रहिवासी भाग असल्याने येथे लहान मुले नेहमी खेळत असतात. पुलाला मजबूत कठडा नसल्याने खेळताना मुले नाल्यात पडण्याची भीती पालकांकडून सतत व्यक्त केली जात आहे.
भविष्यातील दुर्घटनेला प्रशासनच जबाबदार
स्थानिक रहिवाशांनी नगर परिषद प्रशासनाकडे या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या आहेत. झाडाझुडपांची छाटणी करणे, नवीन मजबूत रेलिंग बसवणे आणि उघड्या विद्युत यंत्रणेची दुरुस्ती करणे यांसारख्या प्राथमिक मागण्यांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. जर वेळेत ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात घडणाऱ्या दुर्घटनेला प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे.