राज्यातील महायुती सरकारमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
SIR मोहिमेनंतर २ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळल्याचा दावा; ‘सरनाईकांचा दावा हास्यास्पद’ म्हणत भाजप आमदारांचा आरोपांना विरोध
मुंबई : राज्यातील महायुती सरकारमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील मतदार यादीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपने बोगस मतदारांच्या आधारे मीरा-भाईंदर महापालिकेत सत्ता मिळवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरनाईकांच्या आरोपांवर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी तीव्र प्रतिक्रिया देत हे दावे फेटाळले असून, त्यांना ‘हास्यास्पद’ ठरवले आहे.
निवडणूक आयोगाच्या नुकत्याच झालेल्या SIR मोहिमेनंतर मीरा-भाईंदर आणि ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मोठ्या संख्येने मतदारांची नावे कमी झाल्याचा दावा सरनाईक यांनी केला आहे. मतदार यादीतील तब्बल ५५ टक्के नावे बोगस किंवा बनावट असल्याचा आरोप करत, याच मतदारांच्या जोरावर भाजपने पालिका निवडणुकीत विजय मिळवल्याचा दावा त्यांनी केला.
‘मतदार यादीतील गोंधळामुळे आमचा पराभव’
मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान आणि गैरप्रकार झाल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. मतदार याद्यांमधील गोंधळ आणि प्रशासकीय पातळीवरील निष्काळजीपणामुळे आपल्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला, असा त्यांचा दावा आहे.
निवडणुकीदरम्यान झालेल्या या प्रकारामुळे जनता आणि उमेदवारांची फसवणूक झाल्याचे सरनाईक यांनी सांगितले. त्यांच्या मते, योग्य परिस्थितीत आमचा विजय निश्चित होता. मात्र, मतदार याद्यांबाबत वेळेत योग्य ती खबरदारी न घेतल्याबद्दल आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांचीही काही प्रमाणात जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
ओवळा-माजिवडा मतदारसंघातील आकडेवारी
सरनाईक यांनी ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदारांची आकडेवारीही मांडली. या मतदारसंघात एकूण ४८७ बूथ असून ५ लाख ६७ हजार ९७२ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ४२ हजार ६५२ मतदारांचे मॅपिंग झालेले नाही, तर १ लाख ४८ हजार ४०७ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मीरा-भाईंदरमध्ये २ लाख ४५ हजार नावे वगळल्याचा दावा
मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात एकूण ५ लाख १४ हजार ९५० मतदार होते. ड्राफ्ट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापैकी तब्बल २ लाख ४५ हजार मतदारांची नावे कायमस्वरूपी वगळण्यात आली, असा दावा सरनाईक यांनी केला. वगळण्यात आलेले हे मतदार पूर्णपणे बोगस असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.
याशिवाय ४७ हजार ९०१ जणांनी अर्ज दाखल केले असून त्यांचे मॅपिंग अद्याप बाकी आहे. या अर्जांवर सुनावणी होणे बाकी असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. या गटातीलही बहुतांश मतदार बोगस असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
५५ टक्के मतदान बोगस असल्याचा सरनाईकांचा दावा
SIR अहवालाचा हवाला देत सरनाईक यांनी आणखी काही आकडेवारी मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ४ लाख १४ हजार मतदारांपैकी केवळ ३ लाख १ हजार मतदार वैध ठरले, तर २ लाख १३ हजारांहून अधिक मतदार बाद झाले. या आकडेवारीच्या आधारे मतदार नोंदणीतील तब्बल ५५ टक्के मतदान बोगस असल्याचे सिद्ध झाले, असा दावा त्यांनी केला.
नरेंद्र मेहतांचा सरनाईकांना पलटवार
प्रताप सरनाईक यांच्या आरोपांनंतर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. सरनाईकांचा दावा हास्यास्पद असल्याचे मेहता यांनी म्हटले आहे.
सरनाईक स्वतः आणि शिवसेनेचे खासदार याच मतदार यादीच्या आधारे निवडून आले आहेत. त्यामुळे त्याच मतदार यादीतील मतदार बोगस असल्याचा दावा करत असतील, तर ते स्वतःही बोगस मतांच्या आधारे निवडून आले का?, असा सवाल नरेंद्र मेहता यांनी उपस्थित केला.
सरनाईक आणि मेहता यांच्यातील या आरोप-प्रत्यारोपांमुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. दरम्यान, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर या प्रकरणात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.