BJP Policy: 'आवयामी स्थापयामी' नीतीने गावातील निष्ठावंतांना पदमिळण्याची उचकरी करून भाजपाला जबाबदारी देण्यात आली. रस्ते, पाणी, विकास यांसाठी निवडत असलेला निर्णय, मतदारांचा अपेक्षितपणावर नाही.
उपर्यांवरील उपरतीची बारा वर्षे
बसंत कुमार भट्ट
हिंगोली (BJP Policy) : देशात भारतीय जनता पक्षाच्या सत्ता काळाला बारा वर्षे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघर्षाला जवळपास पाऊण शतक पूर्ण होत असताना पक्षासाठी खस्ता खाणारे कार्यकर्ते मात्र आजही नाराजच आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांसाठी भाजपने 'आवयामी स्थापयामी' धोरण आखल्यामुळे निष्ठावंतांना आजही सतरंज्या उचलण्याचीच जबाबदारी मिळत आहे.
केंद्रात बारा वर्षे तर राज्यात नऊ वर्षांपासून भाजप सत्तेत असल्याने इतर पक्षांतील अनेक पदाधिकारी भाजपची वाट धरत आहेत. पक्षात नव्याने दाखल झालेल्या नेत्यांना लगेचच मोठी पदे व सन्मान मिळत असल्याने जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध पक्षांतील पदाधिकार्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पक्ष वाढीसाठी वर्षानुवर्षे झटणार्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नवख्यांना पदांची खैरात वाटली जात असल्याची भावना तीव्र झाली आहे. याचा थेट फटका नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला बसल्याचे दिसून आले.
हिंगोली विधानसभा मतदारसंघात आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लावली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, शहरी विकास यांसारख्या क्षेत्रांत निधी आणून कामे झाली असली तरी त्याचे मतपेटीत रुपांतर झालेले नाही. पक्षाची पारंपरिक ‘व्होट बँक’ म्हणावी तशी वाढलेली नाही, हे नगरपालिका निकालांवरून स्पष्ट होते. हिंगोली, वसमत आणि कळमनुरी नगरपालिका निवडणुकीत भाजपाला नगराध्यक्षपदाच्या लढतीत मोठा फटका बसला. काही ठिकाणी नगरसेवक स्वकर्तृत्वावर निवडून आले, मात्र पक्ष म्हणून अपेक्षित यश मिळाले नाही.
याउलट (BJP Policy) भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाचे जिल्ह्यात प्राबल्य वाढल्याचे चित्र आहे. हिंगोली आणि कळमनुरी नगरपालिकेत शिंदे गटाचे नगराध्यक्ष निवडून आले असून सर्वाधिक नगरसेवकही त्यांचेच आहेत. सत्तेच्या राजकारणात विरोधी पक्षांतील नेत्यांची डाळ शिजत नसल्याने अनेकजण भाजपात येत आहेत. मात्र आलेल्या नेत्यांना तातडीने सन्मान आणि पदे देण्याच्या नादात वर्षानुवर्षे पक्षासाठी राबणार्या निष्ठावंतांकडे दुर्लक्ष होत आहे.
सध्या जिल्ह्यात ‘उपर्यांना संधी आणि निष्ठावंतांना बगल’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे पक्षांतर्गत असंतोष वाढत आहे. हा असंतोष वेळीच दूर न झाल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला त्याची किंमत मोजावी लागू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. निष्ठावंतांना योग्य सन्मान मिळाला नाही तर पक्षाची संघटनात्मक बांधणी कमकुवत होण्याची भीती कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
कुणी सोडला पक्ष तर कोणी झाले गुमनाम
भारतीय जनता पक्षाच्या 'आवयवामी स्थापयामी' या (BJP Policy) धोरणामुळे काही नेते गुमनाम झाले तर काही पक्ष सोडून गेल्याचेही जिल्ह्यात दाखले आहेत. मध्यप्रदेशात राज्यमंत्र्याचा दर्जा मिळालेले श्रीकांत पाटील सध्या राजकीय पटलावरून गुमनाम आहेत. राज्य शासनाची सनदी नोकरी सोडून भारतीय जनता पक्षात आलेल्या माजी मुख्याधिकारी रामदास पाटील यांचा राजकीय प्रवास भारतीय जनता पक्षातून मजल तर मजल करीत काँग्रेस पर्यंत पोहोचला. वसमत तालुक्यात बोटावर मोजण्या एवढेही कार्यकर्ते नसताना पक्षाला जिवंत ठेवणारे श्रीकांत देशपांडे उर्फ नाना सध्या कुठे आहेत याची कधी चर्चाही होत नाही. काही दशकांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जबाबदारी खांद्यावर पेरणारे बब्बू शेठ देशमुख यांच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला कधीही लाभाचे पद मिळाले नाही. राष्ट्र ऋषी अशी पदवी मिळालेल्या नानाजी देशमुख यांच्या कुटुंबाकडे भारतीय जनता पक्षाने कधीही परतफेडीचा भाव मनात ठेवून बघितले नाही. पक्षाच्या या अवस्थेमुळे निष्ठावंत मात्र खजीलच असल्याचे जाणवते.
१२७ सदस्य संख्येत भाजपाचे केवळ १९ नगरसेवक
हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन नगरपालिका व दोन नगर पंचायत आहेत. ज्यामध्ये वसमत नगर पालिकेत स्विकृतसह ३३ सदस्य संख्या आहे. ज्यामध्ये भाजपाचे चार नगरसेवक आहेत. कळमनुरी नगर पालिकेत स्विकृतसह २२ सदस्य असून त्यात केवळ दोन नगरसेवक भाजपाचे आहेत. हिंगोली नगर पालिकेत स्विकृतसह ३८ सदस्य संख्या असून त्यात ६ भाजपाचे नगरसेवक आहेत. औंढा नागनाथ नगर पंचायतमध्ये स्विकृतसह १९ सदस्य संख्या असून त्यात दोन भाजपाचे नगरसेवक आहेत आणि सेनगाव नगर पंचायतमध्ये स्विकृतसह १९ सदस्य संख्या असून त्यात भाजपाचे ५ नगरसेवक आहेत. अशा तीन नगरपालिका व दोन नगर पंचायतमध्ये एकुण सदस्य संख्या १२७ असताना त्यात केवळ भाजपाचे १९ नगरसेवकच आहेत.
भाजपाच्या सर्वाधिक चिंतन व मंथन बैठका
सर्व राजकीय पक्षापैकी केवळ भाजपा मध्येच चिंतन, मंथन बैठका अधिक प्रमाणात घेतल्या जातात. विशेष म्हणजे केवळ निवडणुका पुरत्या या बैठका न घेता सतत वर्षभर वरिष्ठ स्तरावरील मंत्र्यांसह पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळीच्या उपस्थितीत या बैठका घेण्यात येतात. त्यामध्ये चिंतन, मंथन केले जाते. एवढे चिंतन, मंथन होऊन सुद्धा निवडणुकांमध्ये मात्र म्हणावे तसे यश प्राप्त होत नसल्याने १२ वर्षात पक्ष कोणत्या स्तराला येऊन ठेपला आहे हे दिसून येत आहे.