Goa State Biodiversity Board यांच्या वतीने २२ मे २०२६ रोजी राजभवन, गोवा येथे आयोजित विशेष समारंभात गोव्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री. इंगोले यांना प्रदान करण्यात आला.
बबन इंगोले यांना ‘जैवविविधता संवर्धन पुरस्कार २०२५’ प्रदान
हिंगोली (Biodiversity Conservation) : हिंगोली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद घटना घडली आहे. सेनगाव तालुक्यातील म्हाळशी गावचे सुपुत्र आणि समुद्र अभ्यासक बबन इंगोले यांचा गोवा सरकारच्या प्रतिष्ठेच्या ‘जैवविविधता संवर्धन पुरस्कार २०२५’ ने गौरव करण्यात आला आहे. पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.
Goa State Biodiversity Board यांच्या वतीने २२ मे २०२६ रोजी राजभवन, गोवा येथे आयोजित विशेष समारंभात गोव्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री. इंगोले यांना प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना बोलताना बबन इंगोले म्हणाले, “हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून पर्यावरण रक्षणाच्या या प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आणि प्रेरणेचा आहे. निसर्गाप्रती असलेले माझे कर्तव्य अधिक जबाबदारीने पार पाडण्यासाठी हा सन्मान मला सदैव ऊर्जा देत राहील.”
मूळचे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथील रहिवासी असलेले बबन इंगोले सध्या गोवा येथे समुद्र विषयाचे अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत. त्सुनामीचा समुद्रतळात जाऊन शोध घेणाऱ्या पथकामध्ये संपूर्ण आशिया खंडाचे नेतृत्व करण्याचा बहुमानही त्यांना मिळालेला आहे.
यापूर्वीही केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच विविध संस्थांच्या वतीने त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.