Leopard Attack: कोरेगावमध्ये बिबट्याने शेळी व बोकडवर हल्ला करून त्यांना ठार मारले, यात भिवा सहारे यांचे अंदाजे 40 हजाराचे नुकसान झाले आहे.
कोरेगाव, चोप/गडचिरोली (Leopard Attack) : देसाईगंज तालुक्यातील रावनवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी व बोकड ठार झाल्याची घटना घडली असून, यामध्ये शेतकरी भिवा सहारे यांचे सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावनवाडी येथील भिवा सहारे यांनी आपली शेळी व बोकड चोप येथील स्मशानभूमीजवळ चारण्यासाठी नेले होते. दरम्यान, सकाळी सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात शेळी आणि बोकड ठार झाले.
या (Leopard Attack) घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. दिवसा उजेडात झालेल्या या घटनेमुळे वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शंकरपूर येथील क्षेत्र सहाय्यक मोहुर्ले तसेच वनरक्षक कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी वनविभागाने तातडीने उपाययोजना करून (Leopard Attack) बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत देण्याचीही मागणी होत आहे. वनविभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, जनावरांना जंगलाच्या किंवा निर्जन भागात एकटे सोडू नये, असे सांगितले आहे.