श्रीमद् भागवत कथेनिमित्त रामलीला मैदानावर 22 मार्च रोजी भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
हिंगोली (Bhagwat Katha) : श्रीमद् भागवत कथेनिमित्त रामलीला मैदानावर 22 मार्च रोजी भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय कथाकार प. पू. भाईश्री रमेशभाई ओझा यांच्या कथेनंतर संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारून गेले होते.
कथेदरम्यान भाईश्री ओझा यांनी श्रीकृष्ण जन्माचे महत्त्व, धर्म, भक्ती आणि जीवनातील मूल्ये यांचे सुंदर विवेचन केले. त्यांच्या ओजस्वी वाणीमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते. कथेनंतर भगवान श्रीकृष्ण जन्माचा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. रात्री साडे आठ च्या सुमारास श्रीकृष्ण जन्माची घोषणा होताच संपूर्ण परिसर "जय श्रीकृष्ण"च्या जयघोषाने दुमदुमून गेला.
या वेळी महिला मंडळींनी पारंपरिक पद्धतीने पाळणा गात भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा आनंद साजरा केला. त्यांनी भक्तीभावाने ओव्या गात वातावरण अधिकच मंगलमय केले. पाळण्यात ठेवलेल्या बालकृष्णाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संपूर्ण परिसरात भक्ती, आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शेवटी आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले आणि श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा हा सोहळा भक्तिभावात संपन्न झाला.