Bhagavad Katha: रमेश भाई ओझा यांनी सांगितले की भागवत कथा मानव जीवनाला दिशा देते आणि आध्यात्मिक उद्धार करते.
प. पू. रमेश भाई ओझा यांचे प्रतिपादन
हिंगोली (Bhagavad Katha) : भागवत कथा ही केवळ धार्मिक ग्रंथ नसून ती जीवनाला दिशा देणारे अमृत आहे, असे प्रतिपादन प. पू. रमेश भाई ओझा यांनी बुधवारी कथा समाप्ती वेळी आपल्या प्रवचनात केले. हिंगोली येथील रामलीला मैदानावर गजराज बाल गणेश मंडळाच्या पुढाकारातून बुधवारी प. पू. भाईश्री रमेश भाई ओझा यांचे श्रीमद भागवथा समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी रमेशचंद्र अग्रवाल, निकुंज अग्रवाल, कालवाडिया परिवार, कैलास चंद्र खंडेलवाल यांच्या वतीने ग्रंथाची पूजा करून भागवत कथेला सुरुवात करण्यात आली.
भाईश्री बोलताना म्हणाले, भागवत श्रवण (Bhagavad Katha) केल्याने मनुष्याचे जीवन पवित्र होत असून त्याचा आध्यात्मिक उद्धार होतो, असे त्यांनी सांगितले. प्रवचना दरम्यान मानव शरीरातील पंचप्राण आणि पंच उपप्राण यांचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे स्पष्ट करण्यात आले. शरीरात प्राणशक्ती नसल्यास कोणतीही हालचाल अशक्य आहे. हीच प्राणशक्ती सर्व सजीवांमध्ये यात कीटक, पशु, पक्षी, समान स्वरूपात अस्तित्वात आहे. मात्र, प्राणशक्ती कमी होत गेल्यास शरीराची ताकदही क्षीण होत जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे भाईश्री म्हणाले, पंचप्राणांचे कार्य वेगवेगळे असून ते शरीराच्या विविध क्रियांना नियंत्रित करतात. त्यामध्ये रक्त शुद्ध करून ते संपूर्ण शरीरात पोहोचवण्याचे कार्यही समाविष्ट आहे. विशेषतः हृदयासारखे महत्त्वाचे अवयव जन्मापासून अखंड कार्यरत असतात, ही परमेश्वराच्या अद्भुत रचनेची साक्ष असल्याचे नमूद करण्यात आले. यावेळी आधुनिक विज्ञानाशी तुलना करताना, परमेश्वराची सृष्टी आणि रोबोटिक तंत्रज्ञान यामध्ये मोठा फरक आहे, असे सांगण्यात आले. रोबोट हा यांत्रिक पद्धतीने तयार केलेला असून त्याचे हसणे-रडणे हे कृत्रिम असते. परंतु मानवातील भावना, चेतना आणि प्राणशक्ती ही दैवी देणगी आहे, जी कोणत्याही यंत्रात निर्माण करता येत नाही.
तसेच, मानव शरीर आणि देवत्व यातील भेद स्पष्ट करताना सांगण्यात आले की, मानव शरीर हे लोखंडासारखे आहे तर देवत्व हे चांदीसारखे तेजस्वी आहे. पारस मणीच्या स्पर्शाने जसे लोखंडाचे सोने होते, तसेच भागवत कथा आणि परमेश्वर भक्तीमुळे मानवाचे जीवन परिवर्तन घडते, असा सुंदर दृष्टांत देण्यात आला. या (Bhagavad Katha) प्रवचनातून भाविकांना जीवनातील आध्यात्मिक मूल्यांची जाणीव करून देत भागवत श्रवण, नामस्मरण आणि सदाचार यांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यकर्त्यांनी काढला सामूहिक फोटो
मागील पंधरा ते विस दिवसापासून गजराज बाल गणेश मंडळासह इतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कथा संपल्यानंतर भाईश्री सोबत सामूहिक फोटो घेतला.