Bedgaon Death Ghat: गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा–कोरची–राजनांदगाव–छत्तीसगड राज्य महामार्गावरील बेडगाव घाट सध्या नागरिकांसाठी अक्षरशः 'मृत्यूचा घाट' ठरत आहे.
कोरची (Bedgaon Death Ghat) : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा–कोरची–राजनांदगाव–छत्तीसगड राज्य महामार्गावरील बेडगाव घाट सध्या नागरिकांसाठी अक्षरशः 'मृत्यूचा घाट' ठरत आहे. या मार्गावर दररोज लोखंड खनिजाने भरलेल्या शेकडो अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. विशेषतः बेडगाव घाटातील तीव्र चढ आणि काही वाहनांवरील कथित अतिभार यामुळे वारंवार अपघात घडत असून नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या (Bedgaon Death Ghat) घाटात अवजड ट्रक बंद पडणे, मागे घसरणे, रस्त्यावर आडवे होणे किंवा अपघात होणे अशा घटना वाढत आहेत. परिणामी हा मार्ग तासन्तास बंद राहतो. याचा फटका कोरची तालुक्यातील शासकीय कर्मचारी, व्यापारी, विद्यार्थी, रुग्णवाहिका, तसेच अत्यावश्यक उपचारासाठी जाणाऱ्या गंभीर रुग्णांना बसत आहे. अनेकदा रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याने जीव धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, या (Bedgaon Death Ghat) मार्गावरील अवजड वाहनांवर प्रभावी नियंत्रण, वजनमर्यादेची काटेकोर तपासणी, वाहतूक नियोजन आणि नियमित पोलिस बंदोबस्त यांचा अभाव असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. संबंधित यंत्रणेकडून पुरेशी दखल घेतली जात नसल्याचीही नाराजी व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे बेडगाव घाटाचे तातडीने सुरक्षा ऑडिट करण्याची, अतिभार वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची, धोकादायक वळणांवर संरक्षक उपाययोजना वाढविण्याची, वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना त्वरित राबविण्याची मागणी केली आहे.
प्रश्न एकच आहे—आणखी किती अपघात आणि किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? बेडगाव घाटाला 'मृत्यूचा घाट' बनण्यापासून वाचविण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची वेळ आता आली आहे.