Akola-Washim District Bank: मध्यवर्ती सहकारी बँकाने पगारदार कर्मचार्यांच्या अपघात विमा योजनेतून शिक्षक विजय कालवे यांच्या पत्नीला ३० लाख रुपयांचा आर्थिक मदत
अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सामाजिक सुसंवाद
रिसोड (Akola-Washim District Bank) : दि. अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या पगारदार अपघात विमा योजनेअंतर्गत, अपघाती निधन झालेल्या रिठद शाखेचे पगारदार कर्मचारी व येवती येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयाचे शिक्षक कै. विजय सदाशिव कालवे यांच्या पत्नी श्रीमती किरण विजय कालवे यांना ३० लाख रुपयांच्या विम्याच्या रकमेचे वितरण करण्यात आले. बँकेच्या संचालक मंडळाने घेतलेल्या या संवेदनशील निर्णयामुळे एका संकटग्रस्त कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
बँकेच्या संचालक मंडळाकडून पगारदार कर्मचाऱ्यांसाठी ही विशेष 'पगारदार अपघात विमा पॉलिसी' लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या विमा योजनेचा संपूर्ण प्रीमियम बँकेमार्फत स्वखर्चाने भरला जातो, ज्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणताही आर्थिक भार पडत नाही. या कल्याणकारी योजनेअंतर्गत आतापर्यंत २७ पगारदार कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अपघात विम्याचा हक्काचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.
शिक्षक कै. विजय सदाशिव कालवे यांच्या अपघाती निधनाची माहिती मिळाल्यानंतर, रिठद शाखेचे शाखाधिकारी संतोष घुगे यांनी तत्परता दाखवत सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. ही कागदपत्रे मुख्य कचेरीतील हिशेब व बँकिंग विभागाचे प्रफुल पाटील यांच्याकडे पुढील विमा क्लेम कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली. बँकेच्या वतीने तातडीने पाठपुरावा झाल्याने रु. ३० लाखांचा हा विमा दावा मंजूर करण्यात आला. हा विमा दावा बँकेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक डॉ. संतोषकुमार कोरपे, अध्यक्ष डॉ. जयराज संतोषकुमार कोरपे, उपाध्यक्ष रामेश्वर सुभाषराव ठाकरे, माजी संचालक तथा आमदार अमित झनक, संचालक डॉ. धिरज वामनराव देशमुख तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली वितरित करण्यात आला.
या (Akola-Washim District Bank) कार्यक्रमास शिवाजी कव्हर, पत्रकार सतीशभाऊ मांदळे, तालुका प्रमुख एस. पी. तलवारे, मार्केटिंग अधिकारी ग्रेड-१ पी. एन. जाधव, शाखाधिकारी आर. टी. मस्करे, एस. पी. कोकाटे, डी. ए. मुंढे (कार्यालयीन सचिव देखरेख संघ), बी. एन. मोरे, सर्व निरीक्षक, सर्व सचिव तसेच रिसोड तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यासोबतच बँकेच्या रिसोड मुख्य शाखा व रिठद शाखेचे कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.