खा. डॉ. नामदेव किरसान यांची संसदेत मागणी
गडचिरोली (Bank Locker Safety) : बँक लॉकरचा वापर करणार्या ग्राहकांच्या सुरक्षेस प्रथम प्राधान्य देऊन योग्य प्रमाणात नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी खा.डॉ. नामदेव किरसान यांनी संसदेत केली. खा. डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बँक लॉकरच्या सुरक्षेचा आणि ग्राहकांना मिळणार्या तुटपुंज्या नुकसानभरपाईचा मुद्दा उपस्थित केला.
खा. डॉ. किरसान यांनी निदर्शनास आणून दिले की, नागरिक आपले मौल्यवान दागिने व वस्तू सुरक्षित राहतील या विश्वासाने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात. मात्र, बँकेच्या हलगर्जीपणामुळे या वस्तूंचे नुकसान झाले किंवा चोरी झाली, तरी बँकांची जबाबदारी केवळ लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या १०० पट एवढीच मर्यादित राहते. ही रक्कम ग्राहकांच्या प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत अत्यंत नगण्य असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्राहकांना त्यांच्या वस्तूंसाठी स्वतंत्रपणे विमा काढण्यावर अवलंबून न ठेवता, सरकारने सर्व बँक लॉकरसाठी ‘अनिवार्य आणि व्यापक विमा धोरण’ लागू करावे, अशी मागणी खा.डॉ. किरसान यांनी केली. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकेला लॉकरमधील वस्तूंबाबत माहिती नसते, असे कारण मांडले. त्यावर डॉ. किरसान यांनी पर्याय सुचवत सांगितले की, ग्राहकांनी स्वेच्छेने लॉकरमधील मौल्यवान वस्तूंची माहिती बँक अधिकार्यांना दिल्यास, त्या आधारावर विमा संरक्षण देणे शक्य होऊ शकते असेही खा.डॉ. किरसान यांनी निदर्शनास आणुन दिले.