न्याय न मिळाल्याने त्यांनी दि. १ जुलै रोजी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून प्राणत्याग आंदोलन सुरू केले आहे.
मानोरा तालुक्यातील गादेगाव येथील प्रकार; पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्याचे आंदोलन
मानोरा (Baliraja Pandan Road Scheme) : मानोरा तालुक्यातील गादेगाव येथील शासकीय पांदण रस्ता एका व्यक्तीकडून जेसीबी मशीनच्या साहाय्याने खोदून बंद केल्याचा आरोप करत प्रवीण भिमराव राठोड या शेतकऱ्याने न्यायासाठी "प्राणत्याग" आंदोलनाचा इशारा तहसीलदारांना दिला होता. न्याय न मिळाल्याने त्यांनी दि. १ जुलै रोजी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून प्राणत्याग आंदोलन सुरू केले आहे.
तहसीलदार व ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनात शेतकरी प्रवीण राठोड यांनी म्हटले आहे की, गादेगाव येथील सुदाम भीका जाधव यांनी शासकीय पांदण रस्ता जेसीबीने खोदून बंद केला. त्यामुळे या रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पेरणीची कामे ठप्प झाली आहेत. सध्या पेरणीचा हंगाम सुरू असताना रस्ता बंद झाल्याने शेतकऱ्यांसमोर शेतात जाणे आणि पेरणी करणे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

सदर रस्ता शासनाच्या 'बळीराजा पांदण रस्ता योजना' अंतर्गत सन २०११-१२ मध्ये म.ग्रा.रा.रो.ह. योजनेतून बांधण्यात आला होता. शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या रस्त्याची तोडफोड करून शासकीय निधीचे नुकसान करणाऱ्याविरुद्ध अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

जेसीबी जप्त न करणे, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचा पंचनामा अहवाल, ग्रामपंचायत सचिव गादेगाव यांनी मानोरा पोलीस ठाण्याला पाठवलेले कार्यवाहीचे पत्र, शेतकऱ्यांची तक्रार तसेच उपलब्ध साक्षी-पुरावे असूनही संबंधित यंत्रणा उदासीन असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासन यंत्रणेच्या उदासीनतेमुळे न्याय मिळत नसल्याने "प्राणत्याग" हाच न्याय मिळविण्याचा एकमेव पर्याय उरल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी कृषी दिनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून उडी घेण्यासाठी प्राणत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.