Electric Shock Death: चंद्रपूरमध्ये एका लग्नसमारंभात नवरदेवाच्या बहिणीस विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे आनंदी वातावरण दुःखमय झाले.
चंद्रपूर/नागभीड (Electric Shock Death) : भावाच्या घरी लग्नानंतर स्वागत समारंभाची तयारी सुरू असताना नवरदेवाच्या बहिणीस विजेचा धक्का लागला आणि यातच तिचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान नागभीड येथे घडली. स्नेहा विशाल वरभे (३८) रा भद्रावती असे मृतक महिलेचे नाव असून नागभीड येथील तिचा भाऊ अक्षय बाबुराव कायरकर याचा लग्न रविवारी ब्रम्हपुरी येथे थाटामाटात पार पडला . तर आज सोमवारी नागभीड येथे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती . त्यामुळे घरात आनंदी वातावरण होते.
या स्वागत समारंभाच्या तयारीत घरचे सर्वच गुंतले होते. त्यात स्नेहाचाही समावेश होता. स्नेहा काही तरी धुण्यासाठी घराच्या गल्लीत गेली आणि तिचा हाताचा एका विद्युत वायरला स्पर्श झाला. आणि तिला धक्का बसला. हा धक्का एवढा तीव्र असावा की, काही कळायच्या आत क्षणात ती खाली कोसळली. तिथेच उभे असलेल्या इतर नातेवाईकांच्या लक्षात ही बाब आली आणि क्षणाचाही विलंब न लावता तिला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र तिची अवस्था लक्षात घेता शासकीय रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. लगेच तिला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही अवधीतच तिचा मृत्यू झाला. आणि बघता बघता आनंददायी वातावरण दुःखमय बनले. अकस्मात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्व कायरकर व वरभे परिवार हादरुन गेला आहे*. सदर मृतक महिलेला पती व दोन जुळे मुलं आहेत, सदर घटनेबद्दल नागभीड येथे हळहळ व्यक्त होत आहे.