Forest Department action: औंढा नागनाथ तालुक्यातील वन विभागाने अवैध सागवान लाकूडसाठा जप्त केला. एकूण दोन लाख आठ हजार पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हिंगोली (Forest Department action) : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार परिसरात शुक्रवारी, 29 तारखेला वन विभागाच्या पथकाने दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध सागवान लाकूडसाठा उघडकीस आला आहे. या कारवाईत एकूण दोन लाख आठ हजार पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांविरुद्ध भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे आणि सहाय्यक वन संरक्षक सचिन माने यांना जवळा बाजार येथील पेट्रोल पंपाजवळील आमराईत सागवान व इतर अधिसूचित वृक्ष प्रजातींची बेकायदेशीर तोड करून लाकूडसाठा केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या (Forest Department action) माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक व मीनाक्षी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल स्वाती कीर्तनकार, वनरक्षक सुधाकर चोपडे, गंगाधर शिंदे व वाहन चालक भूतनर यांच्या पथकाने शुक्रवारी अचानक छापा टाकला.
पहिल्या कारवाईत औंढा नागनाथ येथील करीमोद्दीन खमरोद्दीन खतीम याच्याकडून 202 नग सागवान लाकूड जप्त करण्यात आले. 12.08 घनमीटर आकारमान असलेल्या या लाकडाची किंमत एक लाख त्र्याण्णव हजार नऊशे सतरा रुपये इतकी आहे. त्याच्याविरुद्ध वन गुन्हा क्रमांक 04/2026 नोंदविण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाईत जवळा बाजार येथील खान दौलत खान आब्बास याने सागवान व गैर प्रजातीचे लाकडे अवैधरित्या तोडून वाहतूक व साठवणूक केल्याचे आढळून आले. त्याच्याकडून 123 नग लाकूड, 5.845 घनमीटर आकारमानाचे, चौदा हजार एकशे सतरा रुपये किमतीचे जप्त करण्यात आले असून वन गुन्हा क्रमांक 02/2026 दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही कारवायांमध्ये (Forest Department action) मिळून 17.928 घनमीटर अवैध गोल लाकूड जप्त करण्यात आले असून त्याची एकूण किंमत दोन लाख आठ हजार पंचवीस रुपये आहे. वन विभागाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात अवैध वृक्षतोड, वनवा किंवा वन्यप्राण्यांची शिकार यांसारखे प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी वन विभागाच्या 1926 या टोल फ्री हेल्पलाईनवर तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाने केले आहे.