Aundha Nagnath Temple : हिंगोलीतील ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिराच्या कायापालटासाठी 700 कोटी रुपये मंजूर. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कामाची पाहणी केली
हिंगोली (Aundha Nagnath Temple) : विश्वप्रसिद्ध आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिर परिसराचा कायापालट करण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या 700 कोटी रुपयांच्या भव्य विकास आराखड्याच्या कामाला आता वेग येणार आहे. या नियोजित विकासकामां साठी निश्चित केलेल्या जागेची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज केली. मंदिर परिसरातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला कामाला गती देण्याच्या सूचना केल्या.
कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या विशेष पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून (Aundha Nagnath Temple) औंढा ज्योतिर्लिंगासाठी 700 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून मंदिर परिसराचे जागतिक दर्जाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असून भाविकांना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे देश-विदेशातील भाविकांना सुलभ दर्शनाबरोबरच चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
पाहणी दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुजय देशमुख, उपअभियंता कलटवार तसेच औंढ्याचे तहसीलदार गाडे उपस्थित होते. यावेळी मंदिर परिसराचे पुरातन आणि ऐतिहासिक महत्त्व अबाधित राखून भाविकांना सुलभ दर्शन घेता येईल अशा पद्धतीने आराखड्याची अंमलबजावणी करण्यावर चर्चा करण्यात आली. मंदिराच्या मूळ वास्तूला धक्का न लावता विकासकामे करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष वेरूळकर आणि शासकीय कंत्राटदार संदीप बांगर यांनी उपस्थित राहून विकासकामांच्या तांत्रिक बाजूंची माहिती अधिकाऱ्यांना दिली. आमदार बांगर यांनी मंजूर करून आणलेला निधी आणि प्रत्यक्षातील जागा यांचा समन्वय साधून कामाचा नकाशा अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आला.
यावेळी औंढा देवस्थान संस्थानचे अध्यक्ष, पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंजूर विकास आराखड्यामध्ये अद्ययावत भक्त निवास, प्रशस्त वाहनतळ, दर्शन रांगेचे योग्य व्यवस्थापन आणि संपूर्ण परिसराचे सौंदर्यीकरण अशा विविध कामांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होईल अशी चिन्हे दिसत असून, यामुळे शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.