पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक घरापर्यंत हिरवाई पोहोचवण्याचा निर्धार मोहिमेतून करण्यात आला आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने घरपोच मोफत रोपे; पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना आवाहन
हिंगोली (Art of Living) : पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग, हिंगोली शाखेच्या वतीने ‘हर घर एक पेड़ – एक वृक्ष, एक संकल्प’ या अभिनव उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक घरापर्यंत हिरवाई पोहोचवण्याचा निर्धार या मोहिमेतून करण्यात आला आहे.
“आज लावलेले एक झाड, उद्याच्या पिढीसाठी दिलेली अमूल्य भेट आहे,” या प्रेरणादायी विचारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शुद्ध हवा, तापमान नियंत्रण आणि सुंदर, समृद्ध भविष्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज बनली असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. याच उद्देशाने आर्ट ऑफ लिव्हिंगने हिंगोलीकरांना पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
या अभियानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी होणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला घरपोच मोफत रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नागरिकांनी केवळ वृक्षलागवडीचा संकल्प करायचा असून, रोपे त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संस्थेने स्वीकारली आहे.
‘वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा’ हा संदेश घेऊन आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यकर्ते घरोघरी पोहोचणार आहेत. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी 7083700015, 9421388678, 7972138499, 9922896257, 9322715538 किंवा 8446022043 या क्रमांकांवर संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग, हिंगोलीच्या वतीने करण्यात आले आहे.
‘एक छोटासा प्रयत्न, भविष्याची मोठी सुरक्षितता’ या भावनेतून सुरू झालेला हा उपक्रम हिंगोलीला हरित हिंगोली बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.