स्त्री-पुरुष समानतेचा मूलभूत आधार
पवित्र कुरआन सुरह निसा अध्याय क्रमांक ४ च्या आरंभातच घोषणा करतो की, हे लोकहो! आपल्या पालनकर्त्याची भीती बाळगा ज्याने तुम्हाला एका जिवापासून निर्माण केले आणि त्याच जिवापासून त्याची जोडी (सहचारिणी) बनविली .
पवित्र कुरआन अगदी स्पष्टपणे सांगतो की, संपूर्ण विश्वातील मानव एकाच आई-बापाची संतती आहे. मानवामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोनच घटक त्याला मान्य आहेत. मानव या नात्याने यामध्ये तो कोणताही भेद करीत नाही. इतकेच नव्हे, तर तो सांगतो की स्त्रीला अन्य कोणत्याही घटकापासून नव्हे, तर पुरुषापासून निर्माण केले आहे. अर्थात, स्त्री ही पुरुषाचा अविभाज्य घटक आहे. स्त्री समानतेची ही श्रेष्ठ दर्जाची हाक अगदी तिच्या निर्मितीपासूनच अल्लाहने लावली. याचीच पुनरावृत्ती पवित्र कुरआनद्वारे अल्लाहने करून मानवाला सन्मार्ग दाखविला.
पवित्र कुरआनने तिला मानव म्हणून जगण्याचा केवळ अधिकारच नव्हे तर पुरुष आणि स्त्रीची उत्पत्ती एकाच घटकापासून झाली आहे, हे सांगून दोघांना समानतेचा प्रतिष्ठात्मक दर्जा बहाल केला. इस्लाम एका आदर्श समाजाची संकल्पना प्रस्तुत करतो आणि स्त्री व पुरुष दोघांना त्यांचे कार्यक्षेत्र ठरवून देतो. शिक्षणाचा हक्कच नव्हे, तर अनिवार्य घोषित करतो. वारसा हक्क १,५०० वर्षांपूर्वी दिला. ईशनियमांतर्गत अर्थोपार्जनाचा हक्क देतो. तो स्त्री आणि पुरुष यांना एक दुसऱ्याचे सहकारी व विश्वासू करार देतो. तेव्हा पक्षपाताचा प्रश्नच निर्माण होत नाही. चंद्र-सूर्याप्रमाणे तेजस्वी नाही, सूर्यापासून प्रकाश घेतो; परंतु काय यामुळे त्याचे महत्त्व घटले? नाही ना! त्याच प्रमाणे पुरुष आणि स्त्री मिळूनच समाज वाढीस लागतो. त्याला निरोगी आणि सुव्यवस्थित ठेवण्यास प्रत्येकाला आपली जबाबदारी पार पाडावी लागते. यामध्ये कोणाच्याही प्रधानतेचा अगर वर्चस्वाचा प्रश्नच मूळी उद्भवत नाही. शिक्षक शिक्षकच असणार, परंतु विद्यार्थ्यांशिवाय शिक्षकाचे महत्व नाही.
कुरआनातील हे तत्त्व स्त्री-पुरुष समानतेचे मूलभूत आधार आहेत.
डॉ. नजर शेख,
अकोला