Antrikhedekar-Rohda Road: अंत्रीखेडेकर ते रोहडा या बहुप्रतीक्षित रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांनी केलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले असून संबंधित रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात ४जुन
आमरण उपोषणानंतर प्रशासन जागे; ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय
चिखली (Antrikhedekar-Rohda Road) : अंत्रीखेडेकर ते रोहडा या बहुप्रतीक्षित रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांनी केलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले असून संबंधित रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात ४जुन रोजी संपन्न झाले. रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी चिखली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले होते. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे.
रोहडा–अंत्रीखेडेकर तसेच तपोवन देवी–अंत्रीखेडेकर रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि दुग्ध व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार निवेदने देऊनही कामास सुरुवात होत नसल्याने ग्रामस्थांनी १ जूनपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या (Antrikhedekar-Rohda Road) आंदोलनाची दखल घेत सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांच्या वतीने . दराडे सर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आश्वासनाची पूर्तता करत अंत्रीखेडेकर ते रोहडा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर,दराडे सर तसेच चिखलीचे तहसीलदार विजय सवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत हा विजय जनतेच्या एकजुटीचा आणि सातत्यपूर्ण संघर्षाचा असल्याचे सांगितले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला न्याय मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रस्ता पूर्ण झाल्यानंतर शेतीमाल वाहतूक, दुग्ध व्यवसाय, भाजीपाला व फळबाग विकासाला चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या लढ्यात माजी डॉ. शशिकांत खेडेकर, . दराडे सर गजानन वायाळ, विनायक सरनाईक, संतोष भुतेकर यांच्यासह दोन्ही गावांतील ग्रामस्थ, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी महत्त्वाची भूमिका बजावली. उपोषणात सहभागी झालेल्या सर्व आंदोलनकर्त्यांचे यावेळी विशेष अभिनंदन करण्यात आले. ग्रामस्थांनी आता रस्त्याचे काम दर्जेदार व निर्धारित कालावधीत पूर्ण व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.