बुवाबाजी हा बिनभांडवली आणि बरकतीची खात्री असणारा धंदा आहे.
लातूर येथे बुवाबाजीविरोधी संघर्ष परिषदेचे उद्घाटन; बुवाबाजी हद्दपार करण्यासाठी उपाययोजनांची गरज
लातूर : बुवाबाजी हा बिनभांडवली आणि बरकतीची खात्री असणारा धंदा आहे. बुवा-बाबांकडून महिलांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण होत असल्याचे अशोक खरात प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष प्रा. माधव बावगे यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून लातूर येथे आयोजित बुवाबाजीविरोधी संघर्ष परिषदेत ते बोलत होते. परिषदेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांच्या हस्ते झाले. यावेळी विचारपीठावर प्रधान सचिव रुकसाना मुल्ला, राज्य सरचिटणीस उत्तरेश्वर बिराजदार आणि राज्य निमंत्रित सदस्य हरिदास तम्मेवार उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रा. माधव बावगे म्हणाले की, देवधर्माच्या नावाखाली चालणारी बुवाबाजी ही आध्यात्मिक क्षेत्रातील लुच्चेगिरी आहे. त्यांनी बुवाबाजीची अनेक उदाहरणे व दाखले देत समाजातून ही प्रथा हद्दपार करण्यासाठी विविध उपाययोजनाही सुचविल्या.
परिषदेच्या दुसऱ्या सत्रात जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ भिसे यांनी ‘फलज्योतिषशास्त्राची सत्यता’ या विषयावर पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे मांडणी केली.
परिषदेच्या प्रारंभी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रुकसाना मुल्ला आणि अनिल दरेकर यांनी अभिवादन गीत सादर केले. प्रास्ताविकात उत्तरेश्वर बिराजदार यांनी संघटनेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा धावता आढावा घेतला.
तिसऱ्या सत्रात राज्य सहकार्यवाह बाबा हलकुडे यांनी चमत्कार सादरीकरणातून बुवाबाजीचे प्रात्यक्षिक दाखविले. चौथ्या सत्रात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निमंत्रित सदस्य हरिदास तम्मेवार यांनी ‘बुवाबाजी आणि संत साहित्य’ या विषयावर प्रकाश टाकला.
संतांनी बुवाबाजीला कडाडून विरोध केला असून, बुवाबाजीच्या विरोधात अनेक अभंग लिहिले आहेत. संत साहित्याचा आधार घेऊनच बुवाबाजी कमी करता येऊ शकते, असे प्रतिपादन हरिदास तम्मेवार यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसमोर पूर्वीपेक्षा आता अनेक आव्हाने आहेत. कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हनुमंत मुंडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हा प्रधानसचिव सुधीर भोसले यांनी मानले. परिषदेसाठी गंगाधर गवळी, शहर शाखेचे कार्याध्यक्ष डॉक्टर गणेश गोमारे, प्रधान सचिव ज्योती ढगे, कै. प्रयागबाई महाविद्यालयाचे प्राचार्य एकनाथ पाटील आणि प्रा. बळीराम मोठेराव यांनी परिश्रम घेतले.
परिषदेला राज्य निमंत्रित सदस्य दिलीप आरळीकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनीता आरळीकर, राज्य कार्यवाह अनिल दरेकर, मुरलीधर डोने, सचिन जगताप, भारत रोकडे, किसन सोनटक्के, मारुती घोटरे, चंद्रकांत कांबळे, अशोक बाबळसुरे, राजशेखर बिराजदार, नाना कदम, विनोद ढेपे, विजय पवार, शकुंतला ढगे, मंगल बावगे, डॉ. प्रतिमा गवळी, पत्रकार गौतम कांबळे, तनिष्क रोडे, श्रावणकुमार चिद्री, कोंडीबा राऊत, बाबुराव माशाळकर, प्राचार्य विजयकुमार पाटील, विनायक पाटील, कोंडीबा राऊत, डॉ. उमाकांत किडिले, श्रीमती सलोकता काळे, प्रतिभा गवळी, श्याम वरयानी, तुकाराम महाजन, रोहिणी गोवंडे, श्याम जैन, समाधानताई माने, रामकुमार रायवाडीकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.