आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असताना वर्धा जिल्ह्यात कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
वर्धा (Anti Black Market): आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असताना वर्धा जिल्ह्यात कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने ९ विशेष पथके गठीत केली असून गॅस पुरवठा व वितरणावर काटेकोर लक्ष ठेवले जात आहे.
जिल्ह्यात दररोज सुमारे ५ हजार घरगुती गॅस सिलिंडरची मागणी असताना सध्या अंदाजे ४५०० सिलिंडरचा पुरवठा होत आहे. या तफावतीमुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण होत असल्या तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत पथकांकडून अनधिकृत साठा जप्त करण्यात येत आहे. तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वापरावरही विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यात १९ किलोचे २७५ आणि ५ किलोचे १७३ व्यावसायिक सिलिंडर नोंदणीकृत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
गॅस वितरण प्रक्रियेत ऑनलाइन बुकिंग सक्तीचे करण्यात आले असून त्याशिवाय एजन्सीकडून सिलिंडर देण्यात येत नाही. यामुळे काही नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यातील ग्राहकसंख्येचा विचार करता इंडियन ऑइलचे आणि १,३०,५३४, एचपीसीएलचे २,३५,१०३ बीपीसीएलचे ३०,८८२ ग्राहक आहेत.
प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी राजू रणवीर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जिल्ह्यात गॅसचा पुरवठा समाधानकारक असून अफवांवर विश्वास ठेवू नये. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.