Bhagwanrao Deshmukh: अंगणवाडी सेविका जिल्हातील BLO कामासाठी बेकायदेशीर सक्रियता करण्याच्या आरोपावर विरोध करत असून भगवनराव देशमुख यांनी प्रशासनाला थेट इशारा
हिंगोली (Bhagwanrao Deshmukh) : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांवर निवडणूक विभागाच्या BLO म्हणजेच बूथ लेव्हल ऑफिसर कामाची बेकायदेशीर सक्ती केली जात असल्याचा गंभीर आरोप अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केला आहे. प्रशासनातील काही शिक्षक आणि अधिकारी थेट अंगणवाडी केंद्रांवर जाऊन "जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे आदेश आहेत" असे सांगत सेविकांना धमकावत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील हजारो अंगणवाडी सेविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर अंगणवाडी संघटनेचे राज्य नेते भगवान देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. "अंगणवाडी सेविका घाबरून जाणार नाहीत. प्रशासन कलेक्टरच्या सहीचे पत्र दाखवून भीती घालत असेल, तर आपल्याकडेही लोकप्रतिनिधी, आमदार आणि मंत्र्यांच्या स्वाक्षरीची निवेदने व अधिकृत पत्रे तयार आहेत. त्यांनी त्यांच्या अधिकाराचे पत्र दाखवले तर आपणही मंत्र्यांचे पत्र त्यांच्या तोंडावर दाखवू," असे (Bhagwanrao Deshmukh) देशमुख यांनी ठणकावून सांगितले.
संघटनेने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविकांचे मूळ आणि प्राथमिक काम ० ते ६ वयोगटातील बालकांचे कुपोषण दूर करणे, त्यांना पूरक पोषण आहार देणे आणि पूर्वप्राथमिक शिक्षण देणे हेच आहे. गरोदर माता व स्तनदा मातांची काळजी घेणे हादेखील त्यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग आहे. असे असताना निवडणुकीच्या कामांसाठी त्यांना वेठीस धरणे, गावोगावी फिरून मतदार याद्यांचे काम करायला लावणे हे पूर्णपणे अन्यायकारक आणि बेकायदेशीर आहे. यामुळे त्यांच्या मूळ कामावर परिणाम होऊन शेवटी लहान बालकांचे नुकसान होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
"एकच जिद्द, सक्ती बंद करा" अशी घोषणा देत संघटनेने राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. कोणत्याही सेविकेने दमदाटीला किंवा वरिष्ठांच्या दबावाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जर कोणी BLO कामासाठी जबरदस्ती करत असेल, नोकरीवरून काढण्याची धमकी देत असेल, तर त्याचा कडाडून विरोध करावा आणि तात्काळ तालुका किंवा जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे निर्देश देशमुख यांनी दिले आहेत.
"ही प्रशासकीय हुकूमशाही आम्ही कदापि चालू देणार नाही. अंगणवाडी सेविका शासनाच्या अत्यावश्यक सेवेचा भाग आहेत, त्यांना वेठबिगार समजण्याची चूक करू नये. सर्व भगिनींनो, आता आक्रमक व्हा, एकत्र या आणि आपल्यावरील हा अन्याय मोडून काढा," असे आवाहन करून भगवान देशमुख यांनी राज्यव्यापी संघर्षाची हाक दिली आहे. या प्रश्नावर लवकरच मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.