अचलपूर-परतवाडा याअचलपूर-परतवाडा या जोडशहरांमध्ये अत्यंत धक्कादायकप्रकार समोर आला आहे.
अमरावती (Amravati Case) : अचलपूर-परतवाडा या जोडशहरांमध्ये अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, एका व्यक्तीने प्रेमाच्या नावाखाली अनेक तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याची माहिती उघड झाली आहे. सोमवारी ही घटना प्रकाशात येताच संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, या गैरकृत्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत असल्याचे समोर आले आहे. भाजपकडून तब्बल १८० हून अधिक मुलींचे सुमारे ३५० व्हिडिओ अस्तित्वात असल्याचा दावा करण्यात आल्याने प्रकरण अधिकच गंभीर स्वरूप धारण करत आहे. नाशिकमधील गाजलेल्या खरात प्रकरणानंतर अशा प्रकारची ही आणखी एक घटना असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
प्रेमाच्या आमिषातून जाळे; ब्लॅकमेलद्वारे अत्याचार
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपीने तरुणींशी जवळीक साधत त्यांच्याशी संबंध प्रस्थापित केले आणि त्याच वेळी त्या संबंधांचे व्हिडिओ स्वतःच चित्रीत केले. नंतर हेच व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसारख्या माध्यमांवर पसरवण्यात आले. संबंधित दृश्यांमध्ये पीडित मुलींची असहाय अवस्था स्पष्ट दिसत असून, या व्हिडिओंच्या आधारे त्यांना धमकावून पुन्हा-पुन्हा शारीरिक शोषण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणामागे एकट्या व्यक्तीचा हात नसून, काही साथीदारांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
घटना उघड होताच आरोपी फरार
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संशयित आरोपी कुटुंबासह घरातून पसार झाला आहे. त्याच्या निवासस्थानी कुलूप लावलेले असून, पोलिसांना आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, अद्यापपर्यंत कोणतीही पीडित महिला अधिकृतपणे समोर आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ हेच पुरावे मानून पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिक पातळीवर जोर धरत आहे.
राजकीय पातळीवर हालचालींना वेग
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी लेखी निवेदनाद्वारे सविस्तर माहिती मांडली आहे. त्यांनी महंमद अयान आणि महंमद झोयान या दोन युवकांवर ठोस आरोप करत तातडीने चौकशीची मागणी केली आहे. त्यांच्या निवेदनाच्या आधारे पोलिस यंत्रणा सक्रिय झाली असून, संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे. दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे संकेत मिळत आहेत.
मोठ्या शहरांत विक्रीचा कट; गंभीर आरोप
दरम्यान, अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. “या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. जर सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडिओ प्रसारित होत असतील, तर संबंधित पीडितांनी घाबरून न जाता पोलिसांकडे तक्रार नोंदवावी. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सामाजिक शांतता कायम राखावी,” असे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार बोंडे यांनी केलेल्या दाव्यानुसार, सोशल मीडियाचा वापर करून विशेषतः अल्पवयीन मुलींना फसवले जात होते. त्यांना हॉटेलमध्ये नेऊन त्यांचे चित्रीकरण केले जाई आणि नंतर त्या व्हिडिओंच्या आधारे त्यांच्यावर दबाव टाकला जाई. यामध्ये काही मुलींना मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांत विक्रीसाठी पाठवण्याचा कट रचला गेला असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकाराला विरोध करणाऱ्या मुलींना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही समोर आले आहे.