अहेरी तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायत कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. A
अहेरी (Aheri Fire Incident) : अहेरी तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायत कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून महत्त्वाची कागदपत्रेही सुरक्षित राहिली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान उन्हाचा तीव्र तडाखा आणि विजेच्या दाबातील चढ-उतार यामुळे कार्यालयात शॉर्टसर्किट झाले. त्या वेळी कार्यालय सुरू होते आणि कर्मचारी तसेच काही नागरिक उपस्थित होते. अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि एका इलेक्ट्रिक बोर्डाला आग लागली. त्यामुळे कार्यालयात धुराचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच उपस्थित कर्मचारी आणि नागरिकांनी तत्परता दाखवत आग आटोक्यात आणली. त्यामुळे आग इतरत्र पसरण्यापासून रोखली गेली. आगीमुळे कोणतेही मोठे आर्थिक नुकसान झाले नसल्याचे ग्रामविकास अधिकारी चालीगंजेवार यांनी स्पष्ट केले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, कार्यालयातील कामकाज सुरू असताना ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे. सुट्टीचा दिवस असता तर परिस्थिती अधिक गंभीर झाली असती, अशी चिंता ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.