Fertilizer Dealer License: जिल्ह्यातील ४६ खत निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित केल्यानंतर, कृषी विभागाने खरीप हंगामासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. उच्च दर्जाचे निविष्ठा
खरीप हंगामाच्या पृष्ठभूमिवर कृषि विभागातर्फे पुर्वतयारीला वेग
हिंगोली (Fertilizer Dealer License) : जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत पूर्वतयारीला वेग देण्यात आला असून खत व इतर कृषी निविष्ठांच्या विक्रेत्यांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. शेतकर्यांना उच्च दर्जाच्या निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात तसेच खताचा काळाबाजार, गैरवापर व साठेबाजीला आळा बसावा, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. तपासणीदरम्यान विविध अनियमितता आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण ४६ खत निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
कृषी विभागाने ही (Fertilizer Dealer License) कारवाई करताना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले आहेत. येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यास माहे एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ९८ हजार ३०० मेट्रिक टन खताचे आवंटन आयुक्तालयाकडून मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी आजअखेर जिल्ह्यात ४७ हजार ८०८ मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध असून तो जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी पुरेसा असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. खत टंचाईबाबत पसरवल्या जाणार्या अफवांवर शेतकर्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तसेच विक्रेत्यांनी खताची विक्री ई-पॉस मशीनद्वारेच करावी, युरिया व डीएपी खताची एकाच शेतकर्याच्या नावावर जादा प्रमाणात विक्री करू नये. बाहेरील जिल्ह्यातील शेतकर्यांना खत विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी दिला आहे.