मुंबई आणि उपनगरांदरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.
२० जुलैपासून १२ डब्यांच्या १० लोकलचे १५ डब्यांत रूपांतर; तब्बल सात वर्षांनंतर मध्य रेल्वेवर वाढणार १५ डब्यांच्या फेऱ्या
मुंबई आणि उपनगरांदरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. २० जुलैपासून मध्य रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या लोकल सेवेत वाढ करण्यात येणार असून, यामुळे दररोजच्या प्रवासातील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
मुंबईकडे नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करतात. वाढत्या प्रवासी संख्येमुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत असून, अनेकदा प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागतो. याच गर्दीमुळे अपघाताच्या घटनाही घडत असल्याने रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी विविध उपाययोजना करण्यात येत होत्या.
विशेषतः अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि कल्याण येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून १५ डब्यांच्या लोकलची मागणी सातत्याने केली जात होती. लांबचा प्रवास आणि वाढती गर्दी यामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. अखेर या मागणीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
२० जुलैपासून मध्य रेल्वेवरील १२ डब्यांच्या १० लोकलचे रूपांतर १५ डब्यांच्या लोकलमध्ये करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांसाठी अधिक जागा उपलब्ध होईल आणि गर्दीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
विशेष म्हणजे, तब्बल सात वर्षांनंतर मध्य रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. या लोकल सीएसएमटी–अंबरनाथ, सीएसएमटी–कल्याण, सीएसएमटी–बदलापूर आणि सीएसएमटी–कर्जत या मार्गांवर धावणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना सर्वाधिक फायदा होणार असून, दैनंदिन प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.