गँगस्टरच्या भूमिकेने गाजलेले व्हिन्सेंट पास्टोर काळाच्या पडद्याआड
सहकलाकार मायकल इम्पेरिओली यांनी सोशल मीडियावर दिली माहिती; मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
हॉलिवूडमधील गाजलेल्या ‘द सोप्रानोस’ (The Sopranos) या मालिकेत गँगस्टरची संस्मरणीय भूमिका साकारून लोकप्रिय ठरलेले ज्येष्ठ अभिनेते व्हिन्सेंट पास्टोर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती अभिनेते आणि सहकलाकार मायकल इम्पेरिओली यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्टद्वारे दिली असून, या वृत्तामुळे हॉलिवूड आणि जगभरातील चाहत्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
रविवारी इन्स्टाग्रामवर श्रद्धांजली वाहताना मायकल इम्पेरिओली यांनी व्हिन्सेंट पास्टोर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "माझा प्रिय मित्र आणि सहकारी व्हिन्सेंट पास्टोर आता आपल्यात नाही. हा आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी क्षण आहे. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले, अमेरिका, इटली आणि ऑस्ट्रेलियाचा प्रवास केला. त्याच्यासोबत घालवलेले क्षण कायम स्मरणात राहतील. विनी माझ्यासाठी भावासारखा होता. तो अत्यंत दयाळू आणि आपल्या कुटुंबावर, मित्रांवर मनापासून प्रेम करणारा उत्तम व्यक्ती होता. त्यांची उणीव कायम जाणवत राहील."
व्हिन्सेंट पास्टोर यांच्या निधनाबाबत त्यांचे व्यवस्थापक बॉब मॅकगोवन यांनी द असोसिएटेड प्रेसला माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपासून पास्टोर कोणाच्याही संपर्कात नव्हते. त्यानंतर न्यूयॉर्कमधील सिटी आयलंड येथील त्यांच्या निवासस्थानी ते मृतावस्थेत आढळले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
व्हिन्सेंट पास्टोर यांनी १९८० च्या दशकात अभिनय क्षेत्रात कारकीर्द सुरू केली आणि १९९० च्या दशकात हॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, ‘द सोप्रानोस’ मालिकेतील गँगस्टरची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेली भूमिका ठरली. सुरुवातीला त्यांनी मालिकेत एका गुन्हेगाराची भूमिका साकारली होती. पुढे हेच पात्र एफबीआयचा खबरी बनल्याने कथानकाला वेगळे वळण मिळाले. त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे प्रेक्षकांसह समीक्षकांनीही त्यांचे कौतुक केले होते.
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी व्हिन्सेंट पास्टोर यांनी अमेरिकन नौदलात सेवा बजावली होती. त्यांनी व्हिएतनाम युद्धातही सहभाग घेतला होता. त्यानंतर पेस युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण करून त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. अनेक चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटकांमधून त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली. त्यांच्या निधनामुळे हॉलिवूडने अनुभवी आणि प्रभावी कलाकार गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.