लग्नानंतर काही तासांतच दुर्दैव! केरळमूळच्या भारतीय वैमानिकाचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
(Helicopter Crash) अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात लग्न झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच भारतीय वंशाच्या एका तरुणाचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. 26 वर्षीय डेव्ह फिजी (Dave Fiji) हा डेल्टा एअर लाइन्समध्ये फर्स्ट ऑफिसर म्हणून कार्यरत होता. त्याच्या कुटुंबाची मूळ मुळे केरळमध्ये असून, लग्नानंतर हनिमूनसाठी जात असताना हा भीषण अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, डेव्ह फिजी आणि त्याची पत्नी जेस्नी यांचे शुक्रवारी जॉर्जियातील डॉसनव्हिल येथे विवाहसोहळा पार पडला. या विवाहाला सुमारे 400 पाहुण्यांची उपस्थिती होती. विवाह समारंभानंतर नवदाम्पत्याने रॉबिन्सन R66 हेलिकॉप्टरमधून प्रवास सुरू केला होता. मात्र, हेलिकॉप्टर गंतव्यस्थानी पोहोचण्यापूर्वीच डॉसन काउंटीतील दुर्गम जंगल परिसरात कोसळले.
या अपघातात हेलिकॉप्टर चालकासह डेव्ह फिजी यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी जेस्नी गंभीर जखमी अवस्थेत बचावली असून तिच्यावर अटलांटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सहा तास ढिगाऱ्यात अडकून होती पत्नी
डेव्ह यांचे वडील जॉर्ज फिजी यांनी सांगितले की, अपघातानंतर हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाला बराच वेळ लागला. जेस्नी जवळपास सहा तास हेलिकॉप्टरच्या अवशेषांमध्ये अडकून होती.
जॉर्ज फिजी म्हणाले, "जेस्नीला शुद्ध आली तेव्हा डेव्ह तिच्या मांडीवर पडलेला होता. त्याच्या अंगावर रक्त होते आणि शरीर पूर्णपणे थंड झाले होते. ती स्वतः नर्स असल्याने तिला लगेचच समजले की डेव्ह आता हयात नाही."
उड्डाणापूर्वी हवामानाबाबत व्यक्त केली होती चिंता
डेव्ह स्वतः व्यावसायिक वैमानिक असल्याने त्याने उड्डाणापूर्वी खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेबाबत चिंता व्यक्त केली होती. त्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, डेव्हने हेलिकॉप्टर चालकाला "अशा शून्य दृश्यमानतेत आम्ही कधीही उड्डाण करत नाही" असे सांगितले होते.
मात्र, हेलिकॉप्टर चालकाने अधिक उंचीवरून उड्डाण केल्यास अडचण येणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही वेळातच हा दुर्दैवी अपघात झाला.
अपघाताच्या कारणांचा तपास सुरू
या दुर्घटनेनंतर अमेरिकेच्या National Transportation Safety Board (NTSB) ने तपास सुरू केला आहे. हेलिकॉप्टर नेमके कशामुळे कोसळले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघातामागील नेमके कारण समोर येणार आहे.
या घटनेमुळे फिजी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, लग्नाच्या आनंदाचे वातावरण काही तासांतच शोकांत बदलले.