मनोरंजन

मौनी रॉयच्या घटस्फोटानंतर दिशा पटानी ट्रोल; सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप

अभिनेत्री मौनी रॉय हिने पती सूरज नंबियार यांच्यापासून विभक्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. मात्र, या घोषणेनंतर मौनीची जवळची मैत्रीण दिशा पटानी हिला नेटिझन्सनी लक्ष्य केले असून तिच्यावर विविध प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत.

काही दिवसांपूर्वी मौनी आणि सूरज यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते. तसेच दोघांनी एकत्रित फोटोही हटवले होते. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर गुरुवारी रात्री दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याची माहिती दिली.

या घोषणेनंतर सोशल मीडियावर काही चाहत्यांनी दिशा पटानीवर निशाणा साधला. काहींनी “दिशाने मौनीच्या संसारात हस्तक्षेप केला” अशा प्रकारच्या कमेंट्स केल्या. वाढत्या ट्रोलिंगमुळे वैतागलेल्या मौनीने अखेरीस तिच्या पोस्टवरील कमेंट्स सेक्शन बंद केल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे, दिशा पटानी आणि मौनी रॉय या दोघी जिवलग मैत्रिणी मानल्या जातात. अनेक कार्यक्रम, पार्टी आणि परदेश दौऱ्यांमध्ये त्या एकत्र दिसल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर सुरू झालेल्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, दिशाचेही यापूर्वी अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत ब्रेकअप झाले होते. आता मौनी आणि दिशा दोघीही सिंगल असल्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.