स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीस

विधान परिषद निवडणूक 2026 :महायुतीत विधान परिषद जागावाटप निश्चित; भाजप 11, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार

Vidhan Parishad Election 2026

मुंबई (Vidhan Parishad Election 2026) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2026) महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात अखेर जागावाटप निश्चित झाले असून 17 जागांसाठी अंतिम फॉर्म्युल्यावर एकमत झाले आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे. या जागावाटपात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, नाशिक, परभणी-हिंगोली आणि यवतमाळ या चार महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जागा आल्या आहेत. या जागांवर उमेदवारांची अधिकृत यादीही जाहीर करण्यात आली आहे.

ठाणे मतदारसंघातून रवींद्र फाटक, नाशिकमधून नरेंद्र दराडे आणि परभणी-हिंगोली मतदारसंघातून सईद खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर यवतमाळ मतदारसंघासाठी दुष्यन्त चतुर्वेदी, किरण पांडव आणि सलीम खातून यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. या यादीमुळे संबंधित जिल्ह्यांतील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, परभणी-हिंगोली मतदारसंघातून अल्पसंख्यांक समाजातील युवा चेहरा सईद खान यांना उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. सईद खान हे शिवसेनेच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष असून, खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

या निर्णयाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची “स्मार्ट राजकीय खेळी” म्हणून पाहिले जात आहे. मराठवाड्यातील अल्पसंख्यांक समाजाला थेट प्रतिनिधित्व देत शिवसेनेने आपली संघटनात्मक पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

या उमेदवारीमुळे केवळ परभणी-हिंगोलीच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अल्पसंख्यांक समाजात या निर्णयाचे सकारात्मक स्वागत होत असल्याचे चित्र दिसत असून, आगामी निवडणुकांमध्ये त्याचा राजकीय फायदा शिवसेनेला मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दुसरीकडे, महायुतीतील जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता सर्व पक्षांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये प्रचार आणि रणनीतीवर लक्ष केंद्रित केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत क्रॉस वोटिंग आणि स्थानिक गटबाजीचा परिणाम निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

शिवसेना (शिंदे गट) उमेदवार यादी – विधान परिषद 2026: •    ठाणे : रवींद्र फाटक •    नाशिक : नरेंद्र दराडे •    परभणी-हिंगोली : सईद खान •    यवतमाळ : दुष्यन्त चतुर्वेदी / किरण पांडव / सलीम खातून (चर्चेत)

महायुतीतील या जागावाटपानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत असून सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.