चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषदेत अरुण लखानींचा बिनविरोध विजय
(Unopposed Election) महायुतीच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, असे आवाहन सातत्याने करण्यात येत होते. अशातच चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, त्यानंतर भाजपाचे उमेदवार अरुण लखानी यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे.
उमेदवारी मागे घेतल्यानंतर शैलेश अग्रवाल यांनी काँग्रेसमधील काही स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले. निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधील काही नेत्यांनी भाजप उमेदवाराला मदत केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच भाजपाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ पैसे वाटप करण्याचे कामही काँग्रेसमधील काही नेत्यांनी केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पक्षांतर्गत गटबाजी, संख्याबळाचा अभाव आणि काही स्थानिक नेत्यांच्या भूमिकेमुळे उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. त्यांच्या या आरोपांमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुधीर कोठारी यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणुकीतील प्रमुख प्रतिस्पर्धी मैदानाबाहेर गेल्याने भाजपाचे अरुण लखानी यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दोन्ही प्रमुख उमेदवारांनी माघार घेतल्याने या मतदारसंघात मतदानाची गरज उरली नाही. परिणामी निवडणूक अधिकाऱ्यांनी अरुण लखानी यांना बिनविरोध विजयी घोषित केले.
अरुण लखानी यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसमधील कथित अंतर्गत कलह आणि अग्रवाल यांनी केलेल्या आरोपांमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या विजयामुळे विधान परिषदेत भाजपाला आणखी एक प्रतिनिधित्व मिळाले आहे.