इंधन संकटादरम्यान थारमधून आशेचा किरण; वाळवंटात उमललं ‘काळं इंधन’
(Thar Desert) जागतिक पातळीवर इराण–इस्रायल–अमेरिका तणावामुळे तेलपुरवठ्यावर परिणाम होत असताना, भारताने ऊर्जा आत्मनिर्भरतेकडे महत्त्वाची झेप घेतली आहे. राजस्थानमधील थार वाळवंटातील वाघेवाला तेल क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्रातील ऑयल इंडिया लिमिटेड (OIL)ने कच्च्या तेलाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ साधली आहे. येथे दररोजचे उत्पादन 705 बॅरलवरून थेट 1202 बॅरलपर्यंत वाढवण्यात यश आले आहे.
या वाढीमागे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. वाघेवाला क्षेत्रातील कच्चे तेल घट्ट स्वरूपाचे असल्यामुळे पारंपरिक पद्धती प्रभावी ठरत नव्हत्या. यावर उपाय म्हणून ‘सायक्लिक स्टीम स्टिमुलेशन’ (CSS) या थर्मल तंत्राचा वापर करून तेल पातळ करण्यात येत आहे. यासोबतच ‘फिशबोन ड्रिलिंग’ आणि ‘बेअरफुट कंप्लीशन’ यांसारख्या आधुनिक ड्रिलिंग तंत्रांचा देशात प्रथमच वापर करण्यात आला आहे. ‘डायल्यूएंट इंजेक्शन’ आणि ‘आर्टिफिशियल लिफ्ट सिस्टम’मुळे उत्पादनात सुमारे 70 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.
या क्षेत्रातून काढलेले कच्चे तेल जैसलमेरहून टँकरद्वारे गुजरातमध्ये पाठवले जाते. मेहसाणा येथील ओएनजीसी केंद्रात ते साठवले जाते आणि त्यानंतर वडोदरा मार्गे पाइपलाइनद्वारे इंडियन ऑईलच्या कोयाली रिफायनरीमध्ये शुद्धीकरणासाठी पोहोचवले जाते.
राजस्थान बेसिनमधील बिकानेर-नागौर उप-बेसिनमध्ये 1991 साली या तेलसाठ्याचा शोध लागला होता. सध्या येथे 52 विहिरींपैकी 33 कार्यरत असून, चालू वर्षात 13 नवीन विहिरींचे उत्खनन करण्यात आले आहे. तसेच 19 विहिरींमध्ये CSS प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये येथे 45,773 मेट्रिक टन उत्पादन झाले असून, मागील वर्षाच्या 32,787 मेट्रिक टनांच्या तुलनेत ही लक्षणीय वाढ आहे.
थार वाळवंटातील कठीण भौगोलिक परिस्थितीत साधलेले हे यश देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.