पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांना मार्गदर्शन
खासदार डॉ. रामराव वडकुते यांनी मांडले महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे विविध मुद्दे
हिंगोली (PM Narendra Modi) : आज नवी दिल्ली येथे राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांसाठी आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आत्मीय भेट घेण्याचे व त्यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभण्याचे भाग्य राज्यसभा खासदार डॉ. रामराव वडकुते यांना लाभले. या प्रसंगी पंतप्रधानांनी आपल्या प्रदीर्घ संसदीय अनुभवाच्या आधारे नव्या खासदारांना संसदीय परंपरा, जनप्रतिनिधी म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या, जनसेवेचे मूलमंत्र आणि संसदेमार्फत राष्ट्रहितासाठी प्रभावी योगदान कसे देता येईल, याबाबत अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. रामराव वडकुते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली. विशेषतः धनगर समाजाच्या प्रलंबित प्रश्नांचे तातडीने निराकरण, मराठवाड्याचा विकास अनुशेष दूर करण्यासाठी विशेष विकास आराखडा, औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी स्वतंत्र औद्योगिक धोरण, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, शेती व सिंचन विकास, तसेच महाराष्ट्राला "संतांची भूमी" म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक प्रभावीपणे विकसित करण्यासाठी विशेष पर्यटन धोरण राबविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
याशिवाय मराठवाड्यात उद्योग, शिक्षण, आरोग्य, रेल्वे, रस्ते, क्रीडा सुविधा, पर्यटन, कृषी मूल्यवर्धन, जलसंधारण आणि ग्रामीण विकासासाठी केंद्र सरकारकडून अधिकाधिक सहकार्य मिळावे, यासंदर्भातही सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्रातील संत परंपरा, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून संवर्धन व विकास करण्याबाबतही त्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.
या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विकसित भारताच्या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा, विकास आणि जनसेवा यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. "राष्ट्र प्रथम, जनसेवा सर्वोपरि" हा मंत्र आत्मसात करून संसदेमध्ये प्रभावी भूमिका बजावण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले.
बैठकीनंतर खासदार डॉ. रामराव वडकुते यांनी सांगितले की, पंतप्रधानांचे मार्गदर्शन अत्यंत प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांमुळे जनकल्याण, सुशासन आणि राष्ट्रनिर्मितीचा संकल्प अधिक दृढ झाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून नवी ऊर्जा, नवचैतन्य आणि जनतेसाठी अधिक समर्पितपणे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
डॉ. वडकुते यांनी पुढे सांगितले की, राज्यसभेत महाराष्ट्राच्या, विशेषतः मराठवाडा, हिंगोली जिल्हा आणि धनगर समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी ते सातत्याने आवाज उठवतील. केंद्र सरकारच्या विविध योजना आणि विकास प्रकल्पांचा जास्तीत जास्त लाभ महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते कटिबद्ध राहतील. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित विविध विषयांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.