महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अन्न व औषध निर

MPSC अन्न व औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण; तक्रारदारानेच तक्रार बनावट असल्याचा केला दावा

ईमेलद्वारे कबुलीमुळे खळबळ; नंदुरबार कोचिंग क्लास कनेक्शनचीही चौकशी, आज संबंधितांची प्रत्यक्ष सुनावणी

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अन्न व औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात अनपेक्षित घडामोड समोर आली आहे. पेपरफुटीची तक्रार करणाऱ्या व्यक्तीनेच नंतर ईमेल पाठवून ती तक्रार बनावट असल्याचे सांगितल्याने संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले असून चौकशी अधिक गुंतागुंतीची बनली आहे.

अन्न व औषध निरीक्षक पदाची परीक्षा 22 मार्च रोजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. त्यानंतर 12 जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला. पुढे 1 ते 21 जुलै या कालावधीत उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आणि 22 जुलै रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, त्यानंतरच्या दिवशी म्हणजे 23 जुलै रोजी एमपीएससीला ईमेलद्वारे पेपरफुटीची तक्रार प्राप्त झाली.

तक्रार मिळताच एमपीएससीने तातडीने संबंधित तक्रारदाराकडे पुरावे मागवले. तसेच तक्रारदार आणि संबंधित उमेदवारांना प्रत्यक्ष चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, आज या प्रकरणाची चौकशी होणार आहे.

दरम्यान, काल उशिरा रात्री याच तक्रारदाराने आयोगाला आणखी एक ईमेल पाठवत धक्कादायक दावा केला. त्या ईमेलमध्ये पेपरफुटीची तक्रार ही खोटी असल्याचे नमूद करण्यात आले असून, परीक्षा पुन्हा होऊ नये म्हणून पेपरफुटीचा बनाव रचल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या दाव्यानंतर संपूर्ण प्रकरणात नव्याने संशय निर्माण झाला आहे.

तपास यंत्रणांकडून आणखी एका महत्त्वाच्या बाबीची छाननी सुरू आहे. कथित संभाषण 20 मार्च रोजी झाल्याचा दावा करण्यात आला असताना, त्याबाबतची तक्रार 24 जुलै पर्यंत उशिरा का करण्यात आली, याचाही तपास केला जात आहे.

नंदुरबार कनेक्शनही चर्चेत

या प्रकरणाचे धागेदोरे नंदुरबारपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. कौटिल्य क्लासेसचे संचालक प्रवीण पाटील यांच्यावर पेपरफुटीचे आरोप करण्यात आले होते. मालेगाव येथील एका विद्यार्थिनीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत प्रवीण पाटील यांनी पेपर मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा दावा केला होता.

मात्र, प्रवीण पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावत कोणताही पेपर लीक केलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.

तक्रारदारानेच तक्रार बनावट असल्याचा दावा केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणात मोठा गोंधळ निर्माण झाला असून, आज होणाऱ्या चौकशीत नेमके कोणते तथ्य समोर येते याकडे उमेदवारांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.