चिखलीच्या शेतकऱ्यांचा आवाज आ. श्वेता महाले यांनी मांडला विधानसभेत
अनुदानित सोयाबीन बियाण्यांचा लक्ष्यांक वाढविण्याची मागणी
चिखली (MLA Shweta Mahale) : विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे अनुदानित सोयाबीन बियाणे वाटपातील गोंधळ आणि शेतकऱ्यांवर झालेला अन्याय सभागृहाच्या निदर्शनास आणून देत शासनाकडे लक्ष्यांक वाढविण्याची ठाम मागणी केली.
दरवर्षी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदानित सोयाबीन बियाण्यांचे वितरण करण्यात येते. मात्र यावर्षी बियाणे वाटपाचा लक्ष्यांक मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्यामुळे हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिल्याचा गंभीर मुद्दा आमदार श्वेता महाले पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. तसेच २५ किलोच्या पिशव्यांमध्ये बियाणे वितरण केल्यामुळे मंजूर प्रमाण आणि प्रत्यक्ष वाटप यामध्ये विसंगती निर्माण झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
चिखली तालुक्यात ८ हजार १६६ शेतकऱ्यांनी अनुदानित बियाण्यासाठी मागणी नोंदविली होती. मात्र केवळ ९०६ शेतकऱ्यांनाच बियाणे मिळाले असून तब्बल ७ हजार २६० शेतकरी वंचित राहिले आहेत. मागणीच्या तुलनेत ४३ क्विंटल कमी बियाणे उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे, असे आमदार महाले यांनी सभागृहात स्पष्ट केले.
बुलढाणा तालुक्यातही याच प्रकारची परिस्थिती असून ४८ हजार ३९३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असताना फक्त ४ हजार ८२२ शेतकऱ्यांना बियाणे मिळाले आहे. परिणामी ४३ हजार ५७१ शेतकरी वंचित राहिले असून गतवर्षीच्या तुलनेत ७५० क्विंटल बियाणे कमी वाटप करण्यात आल्याची बाब त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली.
शेतकऱ्यांच्या वाढत्या मागणीचा विचार करून अनुदानित सोयाबीन बियाणे वाटपाचा लक्ष्यांक तातडीने वाढविण्यात यावा, वितरणातील गोंधळ दूर करून सर्व पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी ठाम मागणी आमदार श्वेता महाले पाटील यांनी केली.
"शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी माझा संघर्ष यापुढेही कायम राहील," असा निर्धार व्यक्त करत आमदार श्वेता महाले पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली...