नाराज शिवसैनिकांना उध्दव ठाकरेंची भावनिक साद...'या चिमण्यांनो परत फिरा रे...'
हिंगोली (Shiv Sena Uddhav Thackeray) : महाराष्ट्रातल्या सहा खासदारांनी शिवसेनेसोबत केलेल्या गद्दारीनंतर शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी हिंगोलीत आलेल्या उध्दव ठाकरेंनी नाराज शिवसैनिकांना परत शिवसेनेत येण्यासाठी भावनिक साद घातली. राज्यातील शिवसेनेचे सहा खासदार फुटल्यानंतर शिवसेना प्रमुख (Shiv Sena Uddhav Thackeray) उध्दव ठाकरेंनी या सहा मतदार संघात संवाद दौर्याचे आयोजन केले. या आयोजनासाठी हिंगोलीत आले असता त्यांनी शिवसेना सोडणार्यांचा ‘गद्दार व नमक हराम’ असा उल्लेख केला. या खासदारांनी शिवसेनेत असताना अनेक कट्टर शिवसैनिकांना नाराज केले. अशा सर्व शिवसैनिकांनी आता परत फिरून शिवसेनेत येण्याची गरज आहे, अशी भावनिक साद उध्दव ठाकरेंनी घातली. हिंगोलीत दोन वेळा गद्दारी झाली. दोन्ही वेळा गद्दारांना परत निवडूण येता आले नाही. हेमंत पाटील यांचे नाव न घेता, त्याला तर मागच्या दाराने सभागृहात यावे लागले, असा टोला लगावला. हिच अवस्था वाशिमच्या पुर्वीच्या खासदारांची झाल्याचे त्यांनी सांगितले. मुळात या गद्दारांना उमेदवारी देऊ नये असे अनेक शिवसैनिक सांगत होते. आपण त्यांचे न ऐकूण यांना संधी दिली. नागेश पाटील यांनी तर गद्दारी केल्यानंतर आपल्या मुलाला निवडूण आणण्यासाठी मला अनेकांना फोन करायला लावले, असेही उध्दव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेचे खासदार-आमदार फोडले म्हणजे शिवसेना संपत नाही. यापूर्वी जेंव्हा-जेंव्हा शिवसेनेत गद्दारी झाली. तेंव्हा-तेंव्हा शिवसेना आणखी ताकदीने उभी राहीली. पुन्हा एकदा हे आव्हान तुमच्या समोर आहे. हे सांगण्यासाठीच मी आलो आहे. असे सांगुन मी दिलेल्या उमेदवाराने तुमच्या सोबत गद्दारी केली म्हणुन मी तुमची माफी मागण्यासाठी आलो आहे असेही उध्दव ठाकरे म्हणाले. ज्या रामाच्या भरोशावर भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळविली, त्या रामाला भाजपच्या बगलबच्च्यानी लुटले. बाबरी मस्जिद पाडल्यावर भाजपवाले बिळात लपून बसले होते. त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी ही जबाबदारी घेतली. आज त्याच रामाच्या दरबारात चोरी होत आहे. देशात नीट सारख्या परीक्षेचे पेपर फुटत आहेत. आजच टीईटी चा पेपर फुटला. शेतकरी, व्यापारी पासुन सर्वसामान्य नागरीक अडचणीत असताना भाजप खासदार खरेदीचा धंदा करीत आहे. याचे उत्तर सत्ताधार्यांना द्यावे लागेल.असेही उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी व्यासपिठावर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी खासदार शिवाजी माने, संपर्क प्रमुख बबनराव थोरात, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील, संदेश देशमुख, राजेश उर्फ भैय्या पाटील गोरेगावकर, विनायकराव भिसे पाटील, वसिम देशमुख, अयोध्या पौळ , परमेश्वर मांडगे, गणेश शिंदे, डि.के. दुर्गे, यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांचा सामुहीक सत्कार हिंगोली जिल्हा उबाठा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी शक्तिपिठ महामार्ग होऊ नये, यासाठी शेतकर्यांनी उध्दव ठाकरे (Shiv Sena Uddhav Thackeray) यांना निवेदन दिले. राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता झाली.