‘आवाजातून भावना पोहोचल्या तरच दृश्य जिवंत होते’: ध्वनी संकल्पक संकेत धोटकर
देशोन्नती विशेष:
नागपूर (Sound designer Sanket Dhotkar) : चित्रपटातील एखादे दृश्य प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचवण्यात ध्वनीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. केवळ आवाज जोडणे हे ध्वनी संकल्पकाचे काम नसून त्या ध्वनीतून भावना पोहोचवणे हेच खरे ध्येय असते, असे मत प्रख्यात ध्वनी संकल्पक संकेत धोटकर (Sanket Dhotkar) यांनी देशोन्नतीशी बोलताना व्यक्त केले.
भारतीय चित्रपटसृष्टीत ध्वनी संकल्पक, साउंड एडिटर, फॉली डिझायनर, एडीआर इंजिनिअर, म्युझिक इंजिनिअर आणि री-रेकॉर्डिंग इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या संकेत धोटकर यांनी आतापर्यंत ४० हून अधिक चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. देऊळ बंद, देऊळबंद २, मुळशी पॅटर्न, धर्मवीर, ख्वाडा, रिंगण, एलिझाबेथ एकादशी, लाथे जोशी, आटपाडी नाईट्स, सरसेनापती हंबीरराव यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी ध्वनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच 'बाहुबली १' आणि 'बाहुबली-२' च्या मराठी आवृत्तीच्या ध्वनी मिश्रणावरही त्यांनी (Sanket Dhotkar) काम केले आहे.
लोकप्रिय ‘असुर २’ वेबसीरिजमध्ये त्यांनी फॉली डिझायनर म्हणून काम केले असून, त्या मालिकेतील ध्वनी अनुभवाला अधिक प्रभावी बनविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मोठ्या शहरांतील स्टुडिओंचा मोह कधी वाटला नाही का, या प्रश्नावर उत्तर देताना संकेत धोटकर (Sanket Dhotkar) म्हणाले, “जिथे संधी कमी असतात, तिथे स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची संधी जास्त असते. कामातील प्रामाणिकपणा, सातत्य आणि दर्जा यांमुळेच यश मिळते. त्यामुळे स्थानापेक्षा काम अधिक महत्त्वाचे आहे.”
ध्वनी क्षेत्रातील प्रेरणास्थानांविषयी बोलताना त्यांनी ऑस्कर विजेते ध्वनी संकल्पक रसूल पोकुट्टी (Rasool Pokutty) यांचा उल्लेख केला. त्याचबरोबर आपल्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे गुरू तुषार पंडित (Tushar Pandit) आणि अनमोल भावे (Anmol Bhave) यांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. “त्यांच्या सहवासातून आणि मार्गदर्शनातूनच मी या क्षेत्रात घडलो. ध्वनीकलेची बारकावे शिकताना त्यांचे योगदान अमूल्य आहे,” असे ते (Sanket Dhotkar) म्हणाले.
सध्या संकेत धोटकर (Sanket Dhotkar) अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करत असून 'मुळशी पॅटर्न २' आणि 'देऊळबंद ३' हे त्यांचे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांच्या चित्रपटांमधील त्यांच्या कामाची विशेष दखल घेतली जाते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या 'देऊळबंद २' मध्ये त्यांनी ध्वनी संयोजन आणि ध्वनी मिश्रणाची जबाबदारी सांभाळली. कमी वेळेत अत्यंत आव्हानात्मक ध्वनी रचना उभी करणे हा या चित्रपटातील मोठा अनुभव असल्याचे ते सांगतात.
भविष्यातील ध्येयाविषयी बोलताना त्यांनी दिग्दर्शक एस. एस. राजामौली (S. S. Rajamouli) यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली. “राजामौली चित्रपटाच्या निर्मितीपूर्व टप्प्यापासूनच ध्वनीला महत्त्व देतात. बाहुबलीमध्ये काम करताना त्यांचा दृष्टिकोन जवळून अनुभवता आला. भविष्यात असा एखादा चित्रपट करायचा आहे, ज्यामध्ये केवळ ध्वनीच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला जाईल,” असे ते (Sanket Dhotkar) म्हणाले.
ध्वनी संयोजनासाठी आवश्यक असलेली स्वतंत्र ‘साउंड बँक’ तयार करण्यासाठी त्यांनी देशभर भ्रमंती केली आहे. विविध प्रदेशांतील नैसर्गिक आवाज रेकॉर्ड करणे हा त्यांचा छंद आहे. “जंगलातील पाऊस, कोकणातील पाऊस आणि शहरातील पावसाचा आवाज वेगवेगळा असतो. प्रत्येक ध्वनीची स्वतंत्र ओळख असते. त्यामुळे प्रवासात मी नेहमी ध्वनिमुद्रक सोबत ठेवतो,” असे त्यांनी (Sanket Dhotkar) सांगितले.
याच ध्वनीप्रेमातून त्यांनी २०२5 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द रॅबिट हाऊस’ (The Rabbit House) या हिमाचल प्रदेशाच्या पार्श्वभूमीवरील चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली. चित्रपटासाठी ते सहा दिवस हिमाचल प्रदेशात वास्तव्यास होते. त्या भागातील नैसर्गिक वातावरण, वारे, पाण्याचे प्रवाह, जंगलातील आवाज आणि स्थानिक ध्वनी प्रत्यक्ष रेकॉर्ड करून चित्रपटात वापरण्यात आले. “त्या प्रदेशाची खरी ओळख ध्वनीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, यासाठी प्रत्यक्ष लोकेशनवरील ऑथेंटिक साउंड रेकॉर्ड करणे आवश्यक होते,” असे ते (Sanket Dhotkar) सांगतात.
ध्वनी संयोजनातील (sound mixer) सर्वाधिक आव्हानात्मक अनुभवांबद्दल बोलताना त्यांनी 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटाचा उल्लेख केला. “युद्धदृश्यांसाठी घोड्यांच्या टापा, तलवारींच्या टक्कर, पाण्याचे आवाज आणि वारीतील वातावरण कृत्रिमरीत्या तयार करावे लागले. त्यासाठी कोयते, झारे, भांडी, क्रिकेट बॅट आणि लहान मुलांच्या टबचाही वापर केला. प्रत्येक ध्वनी आधी स्वतः अनुभवून नंतर तो पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न असतो,” असे ते (Sanket Dhotkar) म्हणाले.
चित्रपटाचा आत्मा समजून घेणे हे ध्वनी संयोजनातील (sound mixer) सर्वांत महत्त्वाचे काम असल्याचे त्यांनी नमूद केले. “प्रत्येक प्रदेश, वातावरण आणि प्रसंगाचा स्वतंत्र ध्वनी असतो. तो अचूक ओळखून योग्य ठिकाणी वापरणे हेच ध्वनी संकल्पकाचे खरे कौशल्य आहे,” असे त्यांनी सांगितले.
ख्वाडा या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटापासून ते रिंगणसारख्या राज्य पुरस्कार प्राप्त चित्रपटांपर्यंत काम केलेल्या संकेत धोटकर यांना ‘टिफिन बॉक्स’ (Tiffin box) चित्रपटासाठी प्रतिष्ठेचा १३वा IRAA पुरस्कार प्राप्त झाला आहे. ध्वनी संयोजकांना अपेक्षित मान्यता मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करताना ते (Sanket Dhotkar) म्हणाले, “दिग्दर्शक, छायाचित्रकार किंवा रंगभूषाकार यांच्याप्रमाणे ध्वनी संयोजकांच्याही (sound mixer) कामाची दखल आता घेतली जात आहे. प्रेक्षकांना ध्वनीचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजू लागल्यावर या क्षेत्रातील कलाकारांनाही योग्य सन्मान मिळेल, असा मला विश्वास आहे.”